पुन्हा सीमा वाद उफाळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा सीमा वाद उफाळणार?
पुन्हा सीमा वाद उफाळणार?

पुन्हा सीमा वाद उफाळणार?

sakal_logo
By

वसई, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतानाच गुजरातचाही राज्यात घुसखोरी सुरू असल्याचा आरोप तलासरी तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. त्याअगोदरदेखील सीमेवरची गावे गुजरातमध्ये जाणार, या चर्चेला उधाण आले असताना आम्ही महाराष्ट्रातच राहणार, अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे, पण हा वाद निर्माण होऊ नये म्हणून महसूल विभागाने दस्तऐवज तपासण्याची लगबग सुरू केली आहे. या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी जातीने लक्ष देत आहेत, त्यामुळे सीमावर्ती भागात नेमके काय सुरू आहे, हे समोर येणार आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात वेवजी, डोंगाडी, कुचाई, संभा, खाबगाव, वेलजी, बोरगाव, उधवा, आच्छाड यांसह १० गावे ही तलासरी तालुक्यात आहेत; पण सीमेवरचे हे ग्रामस्थ रोजगार, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचा वापर यासह वस्तूंच्या खरेदीसाठी गुजरात राज्यात जातात, असे असले तरी आम्ही महाराष्ट्रातच राहणार, अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यातच आता सीमावाद पुन्हा डोके वर काढू लागला आहे. झाई-बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि वेवजी ग्रामपंचायतीतील सीमावर्ती भागात वाद सुरू आहे. त्यातच गुजरातमधील सोळसुंबा ग्रामपंचायतीने महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचा आरोप होत आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी तलासरी भागातील सीमेजवळची गावे गुजरातमध्ये जाणार, अशा चर्चा सुरू होत्या. त्यातच नव्याने सीमावाद उफाळून आला आहे.
गोवाडा, वेवजी ग्रामपंचायत सीमेलगतचा भाग आणि गुजरात राज्यातील सोळसुंबा ग्रामपंचायतीची हद्द पाहण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पाहणी केली होती. त्यामुळे महसूल विभागाला जाग आली असून त्यांनी कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे.
-------------
घरे महाराष्ट्रात, पण नोटिसा गुजरातकडून
सीमेवरील उंबरगाव तालुक्यातील गोवाडा ग्रामपंचायत हद्द २०० मीटर आहे. याठिकाणी एक पूल असून सीमा दर्शविणारा दिशादर्शक दिसेनासा झाला आहे. ही गुंतागुंत सोडविण्यासाठी हा सीमादर्शक फलक व कागदपत्रे महत्त्वाची आहेत. गुजरात शासनाने १९८० मध्ये बेघर कुटुंबांना घरे देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार महाराष्ट्रातील काही गावांतदेखील घरे देण्यात आल्याचे समजते. मात्र त्यांची नोंद ही महाराष्ट्रात असताना घर रिकामे करण्याच्या नोटिसा मात्र गुजरातकडून बजावण्यात आल्या असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-----------
नेत्यांचे दुर्लक्ष
एकीकडे कर्नाटक व महाराष्ट्र सीमावाद राजकीय वळण घेत आहे. त्यातच महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असणाऱ्या गावांचा गुंता सुरू झाला आहे. मात्र याठिकाणी राजकीय मंडळींनी अद्याप लक्ष घातले नाही, तर स्थानिक प्रशासन मात्र कात्रित सापडलेल्या गावांसाठी प्रयत्न करत आहे.
...
हद्द निश्चित करा : जिल्हाधिकारी
तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई गावातील ग्रामस्थांशी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी संवाद साधून समस्यांचा आढावा घेतला. तेव्हा अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ हद्द निश्चित करावी, महसूल विभागाकडे असलेले नकाशे, दस्तऐवज आदींची माहिती घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे गुजरात की महाराष्ट्र हा सीमावाद लवकरच संपेल, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
-------------------------
झाई ग्रामपंचायतीत लवकरच ठराव
हद्द निश्चितीची मागणी सरकार आणि प्रशासनाकडे करण्यासाठी झाई ग्रामपंचायतीकडून लवकरच ठराव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे या ठरावाला सरकारकडून कोणते उत्तर येते आणि यावर कोणता तोडगा निघतो हे देखील स्पष्ट होणार आहे. एकीकडे कर्नाटक व महाराष्ट्र सीमावादाला हिंसक वळण लागत असले तरी येथील सीमावर्ती वाद सामोपचाराने सोडविला जात आहे.