
‘अग्निशमन’चा ड्रोनचा प्रकल्प बारगळला?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अग्निशमन दलातील जवानांच्या सुरक्षेसाठी दुर्घटनेच्या ठिकाणची दृश्ये गोळा करण्यासाठी ड्रोन वापरण्याचा प्रकल्प राबवण्यात येणार होता; मात्र अपेक्षित निकषांवर कोणत्याही कंपनीला अद्याप ड्रोन देणे शक्य झाले नाही. त्यामुळेच बहुप्रतीक्षित ड्रोन प्रकल्प बारगळण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या गरजेनुसार, आग लागलेल्या ठिकाणची दृश्ये मिळवून देतानाच त्याठिकाणी आग विझवण्यासाठी रोबो अपेक्षित होता. हा रोबो आग नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचा पाईप नेण्याची क्षमता असावा, ही मूळ अट दलाने ठेवली होती. त्यासाठी आयआयटी मुंबईची मदतही घेण्यात आली होती; परंतु या अटी व शर्तीवर कोणत्याही कंपनीने या तांत्रिक निकषांवर अशा पद्धतीचा ड्रोन तयार करण्यासाठी रस दाखवला नाही. त्यामुळे या प्रयोगाची तयारी ही केवळ कागदोपत्री औपचारिकता राहिली आहे.
सध्या कॅमेऱ्यासाठी ड्रोनचा वापर
अग्निशमन दलाला प्रामुख्याने आग नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर करायचा आहे; परंतु सध्या उपलब्ध असलेल्या ड्रोनमध्ये प्रामुख्याने कॕमेरा तंत्रज्ञानावर भर दिली जाते. त्यामुळे घटनास्थळीचे फोटो काढणे, शूटिंग करणे, हे काम ड्रोनकडून होत आहे.
पाण्याच्या पाईपसह ड्रोनचा वापर हा कंपन्यांना अशक्य पर्याय वाटत आहे. ठराविक उंचीवर पाण्याच्या पाईपसह ड्रोनने उड्डाण करणे, हे त्याच्या क्षमतेपलीकडे आहे. त्यामुळे आवश्यक निकषांचा ड्रोन अद्याप उपलब्ध झालेला नाही. अग्निशमन दलाला उपयुक्त असा ड्रोन उपलब्ध झाल्यास तो वापरासाठीचा नक्कीच निर्णय घेतला जाईल.
- संजय मांजरेकर,
मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग