
सरपंचांनी गटारात उतरून काढला गाळ
मनोर, ता. १८ (बातमीदार) : मनोर ग्रामपंचायतीचे नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांनी स्वच्छता अभियानात तुंबलेल्या गटारातील गाळ काढण्याचे काम करून गावात आदर्श निर्माण केला आहे. नुकतेच ग्रामपंचायतीच्या वतीने मनोर गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. यात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी गटार आणि परिसर स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियानात भाग घेतल्याने ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे. घरात निर्माण होणारा ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे, कचरा ग्रामपंचायतीच्या कचरा कुंडीत टाकून परिसर स्वच्छ राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले.
मनोर ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचरा उघड्यावर टाकला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावात स्वछता राखण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावात स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामस्थांनी स्वच्छता अभियानात ग्रामस्थांचा सहभाग वाढावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
मनोर ग्रामपंचायत हद्दीत गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधीमुळे ग्रामस्थांची होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित सरपंच चेतन पाटील यांनी गावात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेतला होता. स्वच्छता अभियानात काम करताना थेट सांडपाण्याच्या गटारात उतरून गटारातील गाळ काढला. या उपक्रमात उपसरपंच निदा पटेल आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छता अभियानात भाग घेऊन कचरा उचलून परिसर स्वच्छ केल्याने ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.