
चिंचघर मतदान केंद्रावर बाचाबाची
वाडा, ता. १८ (बातमीदार) ः तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींचे मतदान होत असताना चिंचघर येथे मतदान केंद्रावर सकाळीच उमेदवार व पॅनेलचे प्रमुख यांच्यात बाचाबाची झाल्याने येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा येथे तैनात करण्यात आल्याने वातावरण शांत झाले.
चिंचघर या ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरोधात भाजप असा थेट सामना होत आहे. आज सकाळीच मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच आई गावदेवी ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख तथा भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील व चिंचघर परिवर्तन आघाडीचे प्रमुख तथा उमेदवार मनेश पाटील यांच्यात मतदान केंद्राजवळ काही कारणाने बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ फौजफाटा वाढवत येथील वातावरण शांत केले. सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव, पोलिस उपनिरीक्षक संतोष वाघचौरे यांच्यासह दंगल नियंत्रक पथकाची एक तुकडी व पोलिस कर्मचारी येथे तत्काळ बोलावून घेण्यात आल्याने येथे पोलिस छावणीचे रूप आले होते.