
जनजागरण यात्रा
पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून
‘आप’तर्फे धारावीत ‘जनजागरण यात्रा’
धारावी, ता. १८ (बातमीदार) : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाला देण्यात आला आहे. त्यासंदर्भात आम आदमी पक्षातर्फे रविवारी (ता. १८) काढण्यात आलेल्या जनजागरण यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळी पाच वाजता निघालेल्या यात्रेची सुरुवात काळा किल्ला परिसरातील अशोक सिल्क मिल कम्पाऊंडमधून करण्यात आली.
संत रोहिदास मार्ग, धारावी कोळीवाडा, धारावी मुख्य रस्ता, धारावी क्रॉस रोड, ९० फुटी रस्ता आणि कुंभारवाडा अशी फिरून माटुंगा लेबर कॅम्पमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पदयात्रा विसर्जित करण्यात आली. धारावीतील सर्व रहिवाशांना प्रकल्पात सामावून घ्यावे, एकही रहिवासी बेघर होऊ नये, प्रत्येक कुटुंबाला किमान ४०५ चौरस फुटांचे सरकारी नियमानुसार घर मिळावे, आदी मागण्या पदयात्रेत करण्यात आल्या. पदयात्रेत धारावीबाहेरील कार्यकर्ते व नेते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ४० ते ५० पुरुष व महिला कार्यकर्तेही उपस्थित होते.
धारावीच्या समूह विकासाच्या कोणत्याही योजनांना ‘आप’चा पाठिंबा आहे. आम्ही धारावीकरांच्या सोबत आहोत; परंतु पुनर्विकास प्रकल्पात कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आमच्या मागण्या घेऊन आम्ही जनजागरण पदयात्रा काढली, असे पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष संदीप कटके यांनी सांगितले. आम आदमी पक्ष मुंबई प्रदेश कमिटीचे मुंबई उपाध्यक्ष पायस वर्गीस, किशोर माधे, नीता सोटनकर, प्रभारी धारावी तालुका अध्यक्ष पॉल राफेल, अय्युब शेख आदी कार्यकर्ते व नेते पदयात्रेस उपस्थित होते.