कल्याण जनता सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण जनता सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण
कल्याण जनता सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

कल्याण जनता सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

sakal_logo
By

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : सहकार क्षेत्रात प्रसिद्ध असलेली कल्याण जनता सहकारी बँक आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरमध्ये २३ डिसेंबर रोजी सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सतीश मोढ हे उपस्थिती लावणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, एमडी आणि सीईओ अतुल खिरवाडकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक आदींनी दिली.
कल्याण शहरात सहकार क्षेत्रातील धुरिण दिवंगत माधवराव गोडबोले यांच्या प्रेरणेने २३ डिसेंबर १९७३ मध्ये कल्याण जनता सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. केवळ ५० हजारांचे भाग भांडवल आणि ८० हजार रुपयांच्या ठेवींनी बँकेची मुहूर्तमेढ रोवली गेली. येत्या २३ डिसेंबरला बँक ४९ वर्षे पूर्ण करून ५० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यानिमित्त आयोजित सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली.
बँकेचा गुजरातच्या सुरतमधील शाखेसह राज्याभरामध्ये ४३ शाखांद्वारे ५ हजार कोटींच्या वर व्यवसाय असून, बँकेचे ६० हजार सभासद आणि ३ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. गेल्या ४९ वर्षांपासून म्हणजेच स्थापनेपासूनच कल्याण जनता सहकारी बँक नफ्यात असल्याची माहिती एमडी आणि सीईओ अतुल खिरवाडकर यांनी दिली.

सामाजिक जाणिवेच्या भावनेतून बँकेकडून दर वर्षी आपल्या नफ्यातील एक टक्का रक्कम वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना देत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले; तर या ४९ वर्षांच्या कार्यकाळात बँकेला अनेक नामवंत संस्थांकडून गौरवण्यात आले आहे. त्यातही २०१३ -१४ मध्ये कोकण विभागातील नागरी सहकारी बँकांच्या गटामध्ये राज्य सरकारतर्फे देण्यात आलेला सहकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे; तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेकडून येत्या काळात विविध योजना सुरू करणार असल्याचेही या वेळी स्पष्ट केले.