चार उड्डाणपुलांवर पालिकेचा ताबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार उड्डाणपुलांवर पालिकेचा ताबा
चार उड्डाणपुलांवर पालिकेचा ताबा

चार उड्डाणपुलांवर पालिकेचा ताबा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः सायन-पनवेल महामार्गावरील चार उड्डाण पूल अखेर एमएसआरडीसीने नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. काही दिवसांपूर्वीच या पुलांच्या हस्तांतराची प्रक्रिया पार पडली असून महापालिकेतर्फे आता या पुलांवर दहा कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे.
कळंबोली ते मानखुर्दपर्यंतच्या अंतराचा सायन-पनवेल महामार्गाचा बराचसा भाग हा नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतून जातो. पावसाळ्यात या महामार्गाची अवस्था खराब होत असल्याने बऱ्याचदा त्याची दूषणे प्रवाशांकडून महापालिकेला दिली जात होती. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते चकचकीत आणि महामार्ग खराब अशी अपवादात्मक परिस्थितीत निर्माण होत असल्याने महापालिकेने राज्य सरकारकडे या महामार्गाची मालकी हक्क मागितले होते. मात्र न्यायालयात याप्रकरणी वाद सुरू असल्याने महापालिकेने नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महामार्गावरील दिवे आणि उड्डाण पूल यांचे हस्तांतर टप्प्याटप्प्याने करून देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. याच अनुषंगाने महामार्गावरील वाशी, नेरूळ येथील एलपी उड्डाण पूल आणि सीबीडी-बेलापूर येथील मुंबई व पुणे दिशेने जाणारे दोन्ही उड्डाण पूल महापालिकेकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे या उड्डाण पुलांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी यापुढे महापालिकेकडे असणार आहे.
-----------------------------
रस्ते दर्जेदार होणार
वाशी उड्डाण पुलावरील रस्ता खराब झाला असून थर निघून गेल्याने खडबडीत रस्ता झाला आहे. नेरूळ येथील एलपीचा उड्डाण पूल आणि सीबीडी-बेलापूर येथील दोन्ही उड्डाण पुलांची अवस्था अशीच काहीशी आहे. या उड्डाण पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे, त्याऐवजी महापालिकेतर्फे या सर्व उड्डाण पुलांवर काँक्रिटीकरण व प्लास्टिकपासून तयार केलेल्या डांबरीकरणाचा वापर करून चांगल्या दर्जाचे रस्ते तयार केले जाणार असल्याची माहिती शहर अभियंते संजय देसाई यांनी दिली.
----------------------------
जाहिरातीचे अधिकार एमएसआरडीसीकडे
वाशी, नेरूळ एलपी उड्डाण पूल आणि सीबीडी-बेलापूर येथील दोन उड्डाण पूल अशा चारही उड्डाण पुलांवर उभारण्यात आलेले विजेचे दिवे आणि शेजारच्या कठड्यांवर उभारण्यात आलेल्या मोठ्या होर्डिंग्जवरील जाहिरीतीचे अधिकार सध्या एमएसआरडीसीकडे आहेत. उड्डाण पुलांच्या मालकी हक्कानंतर जाहिरातींचे अधिकार महापालिकेला मिळावेत, अशी मागणी महापालिकेने सरकारकडे केली आहे. या उत्पन्नातून महापालिकेला देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागवता येणार आहे; परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.