मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील ब्लॉकमुळे प्रवाशांचे रविवारी मेगाहाल झाले. विशेष म्हणजे रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दादर, घाटकोपर आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. या ब्लॉकमुळे लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला. त्यामुळे लोकल फेऱ्या सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते. डाऊन धीम्या मार्गावरील जलद लोकल आणि मेल एक्स्प्रेस वळवण्यात आल्या होत्या. हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक कामे हाती घेण्यात आली होती. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली. ब्लॉक संपल्यानंतरही हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये गर्दी असल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले.

हार्बर मार्गावर सायंकाळपर्यंत गर्दी
हार्बर मार्गावर दर रविवारी ब्लॉक घेण्यात येतो, तरीही लोकल फेऱ्या विलंबाने धावत असतात. ब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष फेऱ्या चालवण्यात आल्या; मात्र कुर्ला स्थानकातच लोकल प्रवाशांनी भरल्यामुळे अन्य स्थानकातील गर्दी सायंकाळपर्यंत जैसे थे होती.

आम्ही खासगी कंपनीत काम करतो. रविवारी आम्हाला कामाला जावे लागतात. मात्र, मध्य रेल्वे दर रविवारी मेगाब्लॉक घेते. त्यामुळे आम्हाला गर्दीचा सामना करावा लागतो. मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेसारखे रात्रकालीन मेगाब्लॉक घ्यावेत, जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत.
- मीरा पाटील, डोंबिवली

रविवारी आम्हाला सुटी असल्यामुळे काही कामासाठी बाहेर जावे लागते; मात्र मेगाब्लॉक असल्याने लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. मध्य रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक दिवसाऐवजी रात्री घेतला, तर सोईस्कर होईल.
- रवी वाळकोळी, कल्याण