मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुककोंडी
मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुककोंडी

मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुककोंडी

sakal_logo
By

आसनगाव, ता. १८ (बातमीदार) : मुंबई–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आसनगावजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने एक मार्गिका पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामुळे दहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तासभर वेळ लागत आहे. त्यात काही बेशिस्त अवजड वाहनचालक आसनगाव, वासिंद, खडवली फाट्यावर बेशिस्तपणे क्रॉसिंग करताना दिसत असून वाहतूक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्‍याचे प्रवाशांनी आरोप केला आहे.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आसनगाव येथे रेल्वे पुलाचे; तर हॉटेल परिवार गार्डन येथे नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आसनगाव औद्योगिक वसाहतीला जोडण्यासाठी महामार्गावर उड्डाणपुलाची आवश्यकता होती. सध्या मुंबई–नाशिक महामार्गाचे रुंदीकरकाचे काम सुरू आहे. त्यात आसनगाव परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नॅशनल हायवे ऑथॉरिटीने गावात जाण्यासाठी नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी रस्त्याची एक मार्गिका पूर्ण बंद ठेवली जात आहे. वेहळोली फाटा ते रेल्वे पूल तसेच वेहळोली फाटा ते वासिंद अशा साधारण तीन ते चार किलोमीटरपर्यंतच्‍या मार्गात वाहनांच्या रांगा लागत आहेत. वीकेण्डला या महामार्गावरून वाहनांची चांगलीच वर्दळ असते. त्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नाशिक दिशेला जाणाऱ्या व इगतपुरी-घोटीसारख्या निसर्गरम्य भागातून पुन्हा मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आसनगाव - वासिंदजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली.
प्रत्येक रविवारी आसनगाव, वासिंद आणि खडवली फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागत असताना वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नेहमीच होत असते. फक्त रस्त्यावर उभे राहून नियम मोडणाऱ्या वाहनांना दंड करण्यापलीकडे वाहतुकीचे नियमन करण्याची जबाबदारी पोलिस घेणार का, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

वाहतूक नियोजनाची गरज :
रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढे तसेच हॉटेल परिवार गार्डनजवळ वाहतूक पोलिसांचा ताफा तैनात ठेवणे आवश्यक आहे. पुढे आल्यावर एक मार्गिका बंद केलेल्या ठिकाणी चुकीच्या दिशेने शिरणाऱ्या वाहनचालकांना तत्काळ आवर घालण्यासाठी उपाययोजना करणे, प्रसंगी पोलिसी खाक्या दाखण्याची गरज आहे. तसेच रविवारच्या दिवशी अवजड वाहनांना वेळेचे बंधन ठेवले असले, तर ही परिस्थिती ओढवणार नाही. सकाळी आठ-नऊपासून ही वाहतूककोंडी होत असते आहे. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणाहून प्रवास करताना होणारा त्रास वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे टळू शकतो.

लग्‍नाला उशीर
आसनगाव ते वासिंद येथील मुंबई-आग्रा महामार्गावर भिवंडी येथील लग्नाचे वऱ्हाड डोळखांब येथे नवरीमुलीसहित जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. यामुळे लग्नाला दोन तास उशीर झाला. या वेळी येथे उपस्थित असलेले समाजसेवक दिनेश पाचधरे यांनी पोलिसांना विनंती केल्याने उपस्थित असलेल्या त्‍यांना माणुसकी दाखवत त्या वऱ्हाडाला वाट करून दिली. हा त्‍यांना लग्नाचा आहेर दिल्याची चर्चा या वेळी सुरू होती.