
इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या
अंधेरी, ता. १८ (बातमीदार) : इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७) रात्री घडली. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी नोंद केली असून या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असे सांगण्यात आले. अंधेरीतील गिल्बर्ट हिल, ग्रीन टॉवर सोसायटीमध्ये ब्रक्षिता योगेश सुतार (वय २४) या पतीसोबत गिल्बर्ट हिल परिसरात राहत होत्या. तिला दोन मुले असून ते सासू-सासऱ्याकडे अमरावतीमध्ये राहतात. शनिवारी दुपारी दोघेही कामासाठी घरातून निघाले. रात्री योगेश घरी आला; मात्र ब्रक्षिता घरी आली नव्हती. त्यामुळे त्याने तिच्या आई-वडिलांकडे चौकशी केली असता तिच्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तिचा शोध सुरू असता, अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पतीला समजली. त्याने तिथे धाव घेतली असता त्याला पत्नीने इमारतीवरून उडी घेतल्याचे समजले.