
संशोधक आप्पा परब यांना चतुरंगचा जीवन गौरव
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ ः चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार यंदा दुर्ग संशोधक आप्पा परब यांना प्रदान करण्यात आला. एटीएसप्रमुख सदानंद दाते यांच्या हस्ते परब यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी आप्पा यांच्या पत्नी अनुराधा दाते यांच्यासह विनायक परब, सुधीर जोगळेकर, मंजिरी मराठे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना परब म्हणाले की, या कार्यक्रमातून जाताना तुम्ही असे काही घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचा देश, धर्म, संस्कृती तसेच तुमचे गाव, कुटुंब, घराणे यांचे नाव शाश्वत राहील. स्त्री ही क्षणाची पत्नी; तर अनंत काळाची माता आहे. ती विश्वाची जननी आहे. या सर्व गोष्टीतून शिकून तुम्ही आपल्या मुलांना ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न करा. जो जन्माला येतो तो नुसताच जगू नये. त्याचे काही तरी कर्तृत्व अपार असावे. अशा प्रकारे मनात जाताना काही तरी व्रत घेऊन जा, असे ते म्हणाले.
आप्पांनी संस्कृतमधील अनेक सुभाषितांच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीवरही प्रकाश टाकला. मुलांना पाठांतराची सवय लावून त्यांना सूक्ष्म गोष्टीतून शिकवण्याचा प्रयत्न करा. शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर मांजराचेदेखील कातडे आहे. याचा अभ्यास आपण केला पाहिजे, हेही त्यांनी या वेळी सांगितले.