
तिसाई देवी मंदिर आराखडा लोकार्पण
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : सुमारे २०० वर्षांची परंपरा असलेल्या तिसगावातील तिसाई देवीच्या मंदिरासह संपूर्ण मंदिर परिसराचा कायापालट करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी नवनिर्मितीच्या आराखड्याचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दृक्-श्राव्य माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. या वेळी माजी मंत्री आणि नवी मुंबईचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी मंदिराचा विकास करताना पुराणशास्त्राबरोबर विज्ञानाचा विचार केल्याने संकल्पना तयार करणारे आणि जरीमरी सेवा मंडळाचे कौतुक केले. आमदार गणपत गायकवाड यांनी या मंदिराच्या नवनिर्मितीसाठी तीन कोटी उपलब्ध करून देण्याचे सांगत या मंदिरनिर्मितीत प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन केले; तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले, की जरीमरी सेवा मंडळाने तिसाई मंदिराच्या नवनिर्मित आराखड्याचा जो संकल्प केला आहे तो तडीस जाईलच. त्यासाठी कितीही निधी लागला तरी तो निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे या वेळी आश्वासन दिले.