गर्दुल्ले, मद्यपींचा उद्यानांत उपद्रव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्दुल्ले, मद्यपींचा उद्यानांत उपद्रव
गर्दुल्ले, मद्यपींचा उद्यानांत उपद्रव

गर्दुल्ले, मद्यपींचा उद्यानांत उपद्रव

sakal_logo
By

खारघर, ता. १९ (बातमीदार) : मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांच्या उच्छादामुळे खारघरकरांना विविध मानसिक त्रासांना सोमोरे जावे लागत आहे. शहरातील वर्दळीच्या उद्यानांमध्ये सर्रासपणे हे प्रकार सुरू असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून या नशेखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.
शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने उद्यानांची सुरक्षा रामभरोसे आहे. रात्रीच्या वेळी खारघर वसाहतीमधील उद्यानात दारू पिणे, अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी सेक्टर पंधरामध्ये रात्रभर दारू प्राशन करणारे मद्यपी मैदानातच झोपी गेले होते. या वेळी सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना त्यांना उठवण्याची वेळ आली होती. विशेष म्हणजे शहरातील काही उद्याने व मैदानांवर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे व्यसन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नियमित व्यायाम, विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी शाब्दिक वादावादीचे प्रकारदेखील झाले आहेत. त्यामुळे खारघर शहराच्या दारूमुक्तीसाठी एकीकडे लढा दिला जात आहे; तर दुसरीकडे मात्र शहरातील उद्यानेच मद्यपींच्या बैठकींचे ठिकाण बनले आहे.
--------------------------
घरकुल वसाहतीच्या मागील बाजूस असलेल्या मैदानात सायंकाळी चालण्यासाठी गेलो असता, पंधरा ते वीस वर्षे वयोगटातील मुले मुले एकत्र जमली होती. त्यांच्याबरोबर संवाद साधला असता ही मुले ड्रगच्या आहारी गेल्याचे दिसून आले.
- अॅड. जे. पी. खारगे, पदाधिकारी, भारत माझा सामाजिक संस्था
----------------------
१८ ते ३५ या वयोगटातील तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. अशातच खारघर शहरातही काही सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
- ब्रिजेश पटेल, अध्यक्ष, भाजप, खारघर