खारघरची शान मातीमोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरची शान मातीमोल
खारघरची शान मातीमोल

खारघरची शान मातीमोल

sakal_logo
By

खारघर, ता. १९ (बातमीदार) : पर्यटकांची नेहमी रेलचेल असलेल्या खारघरमधील सेंट्रल पार्कची गेल्या काही वर्षांतच दुरवस्था झाली आहे. या उद्यानातील विविध कलाकृतींची तोडफोड करण्यात आली असून बंद असलेले कारंजे, अस्वच्छतेमुळे लंडनच्या हाईड पार्कच्या धरतीवर खारघरची शान, असा नावलौकिक असलेल्या या उद्यानाकडे नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे.
शंभर कोटी खर्च करून २०१० मध्ये सिडकोने सेंट्रल पार्क नागरिकांसाठी खुले केले होते. मात्र गेल्या बारा वर्षांच्या कालखंडात उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. थीम पार्क म्हणून नावलौकिक असलेल्या या उद्यानातील अनेक वाद्यवृंद गायब झाली आहे; तर काहींची तोडफोड झाली आहे. त्यामुळे युवा पिढीला भारतीय लोकसंगीताची माहिती व्हावी यासाठी केल्या गेल्या प्रयत्नांनाच खीळ बसली आहे. तसेच उद्यानातील कारंजेही अनेक दिवसांपासून बंद असून अ‍ॅम्पी थिएटरचीही दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या उद्यानाच्या देखभालीसाठी सिडकोकडून दरवर्षी कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. मात्र असे असताना उद्यानात कचऱ्याचे ढीग, पिशव्यांमुळे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक घटत आहे.
-------------------------------
कलाकृतींची नासधूस
अ‍ॅम्पी थिएटरच्या बाजूला नागरिकांना बसता यावे, यासाठी स्मार्ट हट ही संकल्पना राबवून निवारा केंद्र तयार केली होती. तसेच भारतीय संगीत कलेतील कथ्थक, भरतनाट्यम् व इतर सर्व नृत्यांची ओळख व्हावी, यासाठीचे थीम पार्क तयार केले होते. पण नृत्याची माहिती देण्यासाठी उभारलेल्या कलाकारांचे पुतळे कधीच गायब झाले असून मुलांसाठीच्या खेळण्यांचीही दुरवस्था झाली आहे.
------------------------
सिडकोकडून फक्त घोषणाबाजी
खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनवण्याची घोषणा सिडकोने केली होती; परंतु प्रत्यक्षात उद्यानाची अवस्था पाहिल्यानंतर नागरिक सिडकोच्या कार्यक्षमतेवरच टीका करू लागले आहेत. सिडको घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सेंट्रल पार्कला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
---------------------------------
आंतरराष्ट्रीय दर्जा फक्त नावापुरता
खारघरमधील सेंट्रल पार्कची माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान, अशी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई तसेच अन्य परिसरांतूनही नागरिक उद्यान पाहण्यासाठी येत असतात; परंतु या उद्यानाची झालेल्या अवस्था पाहून अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या नावाने सिडकोने फसवणूक केल्याची प्रतिक्रिया येणाऱ्या पर्यटकांमधून व्यक्त होत आहे.
-----------------------------
पनवेल पालिका हद्दीत असलेल्या खारघरमधील हे भव्य उद्यान असल्याचे अनेकांनी सांगितले होते. पत्नी आणि मुलांसोबत उद्यानात प्रवेश केला असता वाद्यवृंदाची झालेली तोडफोड पाहून खूप दुःख वाटले. येथे खाद्यपदार्थांचे स्टॅाल, पाणपोई नसल्याने गैरसोय होते.
- अनुज सिंग, करंजाडे
---------------------------------------
सेंट्रल पार्क खूप सुंदर असल्याचे ऐकले होते. कुटुंबासह आलो असता, काही ठिकाणी हिरवळ सुंदर आहे. मात्र, विविध कलाकृतींची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
- विपुल हुंडारे, ऐरोली