स्थापत्यशास्त्राचा नमुना संत फ्रान्सिस झेविअर चर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थापत्यशास्त्राचा नमुना संत फ्रान्सिस झेविअर चर्च
स्थापत्यशास्त्राचा नमुना संत फ्रान्सिस झेविअर चर्च

स्थापत्यशास्त्राचा नमुना संत फ्रान्सिस झेविअर चर्च

sakal_logo
By

गाथा ख्रिस्तमंदिरांची
संदीप पंडित
---------------
वसईच्या इतिहासात पुरातन चर्चना मोठे महत्त्व आहे. यातील काही चर्च ही उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहेत. त्यातीलच एक म्हणजे गिरीज येथील चर्च. वसई-अर्नाळा रस्त्यावर गिरीज चर्च मोठ्या ऐटीत उभे आहे. ‘संत फ्रान्सिस झेविअर चर्च’ या नावाने असलेल्या या चर्चने आपले शताब्दी वर्ष पूर्ण केले आहे.
....
वसईच्या पश्चिम भागात वसई-अर्नाळा रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे लक्ष चर्चच्या दर्शनी भागाकडे वेधले जाते. या चर्चच्या दर्शनी भागावर ‘माणसा तू सारे जग कमावलेस आणि आत्मा गमावलास तर त्याचा काय फायदा!’ हे वाक्य कोरलेले आहे. बायबलमधील या एका वाक्याने संत फ्रान्सिस झेविअर यांना भारावून टाकले होते. प्राध्यापक असलेले फ्रान्सिस झेविअर हे नोकरीला लाथ मारून ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी पुढे सरसावले. धर्मगुरू होऊन ते भारतात आले. त्यांचे पार्थिव अद्यापही गोव्यात आहे, ते भाविकांना पाहण्यासाठी दर दहा वर्षांनी खुले केले जाते. याच गिरीज चर्चचे आश्रयदाते म्हणून बायबलमधील ज्या वाक्यांनी त्यांना मंत्रमुग्ध केले, तेच वाक्य गिरीज चर्चच्या दर्शनी भागावर लिहिले गेले आहे.
वसई आणि आगाशी हा जो दक्षिणोत्तर रस्ता आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही अंगाला ख्रिस्ती भाविक गेली चार शतके वस्ती करून आहेत. पूर्वेकडील मंडळी सांडोर चर्चचा लाभ घेत होती, तर पश्चिमेकडील मंडळी दर रविवारी मर्सेस चर्चला जात होती; परंतु त्यांना चर्च फार दूरवर वाटे म्हणून त्यांची अडचण दूर करण्यासाठी वरिष्ठांनी गिरीज या गावात एक नवीन चर्च उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साधारण शंभर वर्षांपूर्वी गिरीज चर्चची उभारणी झाली. आज वसई पंचक्रोशी हा एक स्वतंत्र धर्मप्रांत झाला आहे; परंतु शंभर वर्षांपूर्वी वसई हा भाग दमणच्या बिशपांच्या अधिपत्याखाली होता. १०० वर्षांपूर्वी दमणचे बिशप डॉम सॅबेस्टियो जोस परेरा यांच्या नेतृत्वाखाली गिरीज धर्मग्रामात एक फादर नेमण्यात आले. त्यांचे नाव फादर अगस्टीन डिसूझा हे होते आणि त्यांनीच या चर्चची उभारणी केली.
....
शिक्षण संस्थेची उभारणी
गेल्या १०० वर्षांच्या प्रवासात या चर्चमध्ये अनेक धर्मगुरू येऊन गेले आहेत. त्यांनी या चर्चमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यापैकी एक म्हणजे फा. पीटर परेरा, ते मूळचे वांद्रे येथील होते. ते १९४० मध्ये गिरीज चर्चचे प्रमुख झाले. या गावात पाऊल टाकताच त्यांना गिरीजमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी येथील मुलांना शालेय शिक्षण मिळावे यासाठी ‘संत फ्रान्सिस झेविअर’ या नावाने १९४२ साली एक शिक्षण संस्था उभी केली. त्याचा फायदा अनेक तरुणांना झाला.

===
चर्चचे नाव जरी गिरीज असले तरी ते मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. एखाद्या डोंगरावरच्या चर्चने जी भूमिका बजावली असती ती भूमिका हे चर्च बजावत आहे. जाणारा येणारा प्रत्येक प्रवासी या चर्चपुढे नतमस्तक होतो आणि त्याचे नाते प्रभूशी जोडले जात आहे.
- फादर रॉबिन डायस, मुख्य धर्मगुरू, गिरीज चर्च