भरावामुळे पाणी तुंबण्याचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरावामुळे पाणी तुंबण्याचा धोका
भरावामुळे पाणी तुंबण्याचा धोका

भरावामुळे पाणी तुंबण्याचा धोका

sakal_logo
By

मनोर, ता. १९ (बातमीदार) : मासवण गावच्या हद्दीत मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या माती भरावात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी भलत्याच ठिकाणी बॉक्स कलव्हर्टचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याला अडथळा निर्माण होऊन पाणी तुंबण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेले बॉक्स कल्व्हर्टऐवजी नैसर्गिक नाल्यावर बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी मासवण गावच्या हद्दीत माती भरावाचे काम सुरू आहे. महामार्गासाठी संपादित झालेल्या गट क्रमांक १९, २७ आणि २९ लगतच्या नैसर्गिक नाल्यात माती भराव करून नाला बुजवण्यात आला आहे, पण माती भरावात नैसर्गिक नाले बुजवल्यामुळे अशोक आत्माराम पिंपळे यांच्यासह पाच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महामार्गाच्या कामात वर्षानुवर्षे नैसर्गिकरीत्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बुजवून पाण्याचा निचरा न होऊ शकणाऱ्या ठिकाणी बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम सुरू केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
....
शेतकऱ्यांची महामार्ग प्राधिकरणाकडे धाव
पावसाळ्यात शेतजमिनीमध्ये पावसाचे पाणी तुंबून फळबाग आणि पोल्ट्री फार्मचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाळ्यात पोल्ट्री फार्ममध्ये कुक्कुटपालन करणे अशक्यप्राय होणार असल्याचे सांगत शेतजमीनी लगतच्या डोंगर उतारावरील पाण्याच्या प्रवाहात शेतीचे नुकसान होऊन उत्पन्नाचे साधन हिरावले जाणार भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बुजवलेले नाले मोकळे करावेत, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक नाल्यांवर बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
...
महामार्ग निर्मितीसाठी सर्व तांत्रिक बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत. महामार्गाच्या आराखड्यानुसार बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम सुरू आहे. तक्रारीच्या अनुषंगाने स्थळपाहणी करण्यास सांगण्यात आले आहे. पाहणी अहवालानुसार आवश्यकता असल्यास योग्य तो बदल करण्यात येईल.
- मुकुंद अत्तरदे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

...
चुकीच्या ठिकाणी बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला असून पावसाळ्यात शेती पाण्याखाली जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यावरच बॉक्स कल्व्हर्ट बांधण्याची मागणी केली आहे.
- अशोक पिंपळे, शेतकरी, मासवण