
येऊर व घोडबंदरवरील धाब्यावर बारा जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : जिल्ह्यातील निर्सगरम्य असलेल्या येऊर व घोडबंदर येथे शनिवार-रविवार अशा सलग दोन दिवस केलेल्या अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या १२ धाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत धाब्यांवरील १२ जणांना अटक करत, अंदाजे २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी अनधिकृत धाब्यांचे समूळ उच्चाटन करण्याकामी इतर विभागाशी संपर्क साधून धाबे व अवैध मद्य विक्रीवर संयुक्तरित्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे अधीक्षक नीलेश सांगड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील येऊर आणि घोडबंदर रोडवर अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या धाब्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार १२ धाब्यांच्या मॅनेजरना अटक करत २१ हजार ९३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क बी विभागाचे निरीक्षक शिवशंकर पाटील व दुय्यम निरीक्षक सलीम शेख, मनोज संबोधी व जवान संदीप पाटील, राजेशकुमार तारू व इतर कर्मचाऱ्यांनी केली.
.........................
गतवर्षाच्या तुलनेत २५.३८ कोटी जास्त महसूल
जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एकूण एक हजार ९७६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये एक हजार २४८ वारस व ७२५ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये एक हजार ३२७ जणांना अटक केली. याशिवाय ८८ वाहने जप्त करण्यात आली आहे. एकूण ७.५० कोटी रुपयांचा मुद्देमाल केला आहे. याच कालावधीत एकूण १३१.०८ कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त करून दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २५.३८ कोटी रुपये जास्त महसूल जमा करून देण्यात विभागाला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................................
कोट :-
येऊर आणि घोडबंदर रोडवरील १२ धाब्यांवर शनिवार-रविवारी कारवाई करण्यात आली. यामध्ये १२ जणांना अटक केली. ते त्या धाब्यांवरील मॅनेजर असून ही कारवाई यापुढे अशी सुरू राहणार आहे.
- नीलेश सांगड, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग.
--