स्टेमी प्रकल्पाअंतर्गत १५ हून अधिक रुग्णांना उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेमी प्रकल्पाअंतर्गत १५ हून अधिक रुग्णांना उपचार
स्टेमी प्रकल्पाअंतर्गत १५ हून अधिक रुग्णांना उपचार

स्टेमी प्रकल्पाअंतर्गत १५ हून अधिक रुग्णांना उपचार

sakal_logo
By

केईएममधील स्टेमी प्रकल्प हृदयविकारग्रस्तांसाठी वरदान
१५ हून अधिक रुग्णांना अँजिओप्लास्टीतून जीवदान

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : केईएम रुग्णालयात हृदयविकाराचा झटका किंवा तशी लक्षणे असलेल्या रुग्णांना गोल्डन अवर म्हणजेच पहिल्या सहा किंवा बारा तासांत रुग्णालयात दाखल केले गेले तर त्यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी करून त्यांचा जीव वाचवणे शक्य होत आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात पहिल्यांदाच स्टेमी प्रकल्प राबवला जात असून ४ नोव्हेंबरपासून हृदयविकाराच्या रुग्णांवर इथे उपचार सुरू झाले आहेत. प्रकल्पांतर्गत एका महिन्यात एकूण १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. सर्वांवर गोल्डन अवर्समध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली.
दरम्यान, लवकरच प्रकल्पाचा विस्तार होणार असून रात्रीही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या मुलाखती सुरू आहेत, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.
स्टेमी प्रकल्पांतर्गत दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सरासरी ३० ते ६२ वयोगटातील रुग्ण होते. सर्वाधिक १३ पुरुष आणि दोन महिलांवर इथे उपचार करण्यात आले. ३० ते ६२ वयोगट वर्किंग गट आहे. तो सर्वसामान्य गटात मोडतो. सर्व रुग्णांमध्ये हृदयाच्या नसा १०० टक्के ब्लॉक झाल्या होत्या. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आले.

मोफत उपचार
अँजिओप्लास्टीचा खर्च सामान्यपणे ६० हजारांपर्यंत येतो; पण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ती शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिली जाते, पण यापुढे एखादा रुग्ण योजनेत बसत नसेल तर महिन्याला दहा रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. स्‍टेमी प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा गरीब रुग्णांना होत आहे. ९० टक्के रुग्ण लालबाग-परळ परिसरातील असून सर्वांचा इतिहास कोकणातला आहे. त्यामुळे तोही एक अभ्यासाचा विषय आहे, असे डीएम कार्डिओलॉजी विभाग युनिटप्रमुख प्रा. डॉ. चरण लांजेवार यांनी सांगितले.

४ ते ५ टक्के मृत्युदर
अँजिओप्लास्टी केल्यानंतरही अनेकदा मृत्यू होण्याचा दर जवळपास ४ ते ५ टक्के आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका येणाऱ्या रुग्णांचे हृदय कमकुवत होते. अशात अँजिओप्लास्टी केली तरी जीव जाण्याचा धोका असतो. हृदयविकारासाठी ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप एप्निया प्रमुख कारणांपैकी एक आहे.

तात्काळ अँजिओप्लास्टीमुळे तरुण वाचला
आनुवांशिक लठ्ठपणा असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी त्याची परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी त्याला तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी संबंधित तपासण्या करून त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. तात्काळ झालेल्या अँजिओप्लास्टीमुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

अनेकांना जीवदान
परळमधील ४० वर्षीय टॅक्सीचालकाला वाढलेल्या वजनामुळे आधीच ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप एपनिया आजार होता. हदयविकाराच्या झटक्यामुळे आपले आयुष्य संपेल अशी त्याला भीती होती, पण वेळ न घालवता तो केईएममध्ये दाखल झाला. त्याच्या नसा १०० टक्के ब्लॉक झाल्या होत्या. डॉक्टरांच्या टीमने तात्काळ अँजिओप्लास्टी करत त्याचे हृदय पूर्वपदावर आणले. अशा बऱ्याच रुग्णांना केईएम रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागांतर्गत जीवदान देण्यात आले आहे.