
स्थलांतरामुळे घरकूलाला विलंब
वसई, ता. १९ (बातमीदार) : आदिवासी बहूल आलेल्या पालघर जिल्ह्यात दुर्गम आणि अतिदुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे येथे शेतीशिवाय इतर कोणतेही रोजगाराचे प्रमुख साधन नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मजूर आणि चाकरमानी हे स्थलांतर करत असतात. त्यामुळे जिल्ह्यात मंजूर असलेल्या अनेक घरकुलांचे काम रखडले असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मंजूर घरकुलांपैकी दहा हजार घर उभारण्याचे काम शिल्लक आहे.
पालघर जिल्ह्यातील छत नसलेल्या कुटुंबीयांना हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यानुसार २०१६ पासून आतापर्यंत सरकारच्या विविध योजनांमधून ३१ हजार ४०० कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. तर घरकुल योजनेचा आणखी ११ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री, शबरी, रमाई व आदिम आवास योजनेतून कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना पक्की घरे मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व्हे केला. त्यानंतर या सर्वेक्षणातील पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामुळे घराचे काम करण्यासाठी लाभार्थ्याला निधी उपलब्ध करण्यात आला आहे. वाडा, पालघर, जव्हार, मोखाडा, डहाणू, वसई, तलासरी, विक्रमगड या भागात आर्थिकदृष्टया सक्षम नसलेले नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना राहण्यासाठी छत देखील उपलब्ध नाही. अशा कुटुंबीयांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असून येथे अनेकांकडे स्वतःची पक्के घरे नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबाची उन्हाळा, पावसाळ्यासह हिवाळा या तीनही ऋतूमध्ये त्यांचे मोठे हाल होतात. अशात लहान मुले, रुग्ण, गरोदर माता आदींना छप्पराविना राहताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे विविध योजना अंमलात आणल्यावर जिल्हा प्रशासनाने घरकुल योजनेला गती दिली. यासाठी पात्र लाभार्थ्यांना चटई क्षेत्र निश्चित करून त्यांना घरे बांधण्यासाठी मंजुरी व आर्थिक मदत शासनाकडून केली जात आहे. यामुळे ताडपत्री, कारवीपासून तयार केलेल्या कच्च्या घरापासून तीस हजाराहून अधिक कुटुंबीयांची मुक्तता झाली आहे.
--------------------------
शिक्षणाचा अडसर दूर
हलाखीची परिस्थिती असली तरी अतिदुर्गम, दुर्गम ग्रामीण भागातील मुलांचा आत शिक्षणाकडे कल वाढला आहे. मात्र कच्च्या घरात शिक्षण घेणे देखील जिकरीचे व आव्हानात्मक असते. पण आता पक्की घरे मिळाल्यावर विजेची व अन्य सुविधा मिळू लागल्याने शिक्षणात येणार अडसर देखील दूर होत आहे.
--
नागरिकांना नवसंजीवनी
गरोदर माता, रुग्णांना देखील घरकुल योजनेचा फायदा होत आहे. पक्क्या घरात औषधोपचार घेण्यासह बदलत्या ऋतूत त्यांना संरक्षण मिळत आहे. त्यामुळे घरकुल योजना जिल्ह्यातील नागरिकांना नवसंजीवनी देत आहे.
------------------------
बांधण्यात आलेली घरकूले
योजना - मंजूर - पूर्ण
आवास योजना - ३४,७६० - २४,९७७
आदिम जमाती - १,१२८ - ६२९
शबरी - ७,१२५ - ५,५०८
रमाई - ४६८ - ३४९