
तिकीट तपासनीसवर ब्लेडने वार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ ः आंबिवली रेल्वेस्थानकात सोमवारी सकाळी एका प्रवाशाने तिकीट तपासणीसाच्या मानेवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. सुनील गुप्ता असे जखमी तिकीट तपासणीसाचे नाव असून त्यांना तत्काळ रेल्वे रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रेल्वे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वेस्थानकात सोमवारी सकाळी सुनील गुप्ता हे कर्तव्यावर होते. फलाट क्रमांक दोनवर ते लोकलमधून येणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळी एका प्रवाशावर संशय आल्याने सुनील यांनी त्याच्याकडे तिकीट विचारणा केली. यावेळी त्या प्रवाशाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुनील हे त्यास पकडण्यासाठी गेले असता त्याने धारदार ब्लेडने सुनील यांच्या मानेवर वार केले आणि नंतर तेथून पळ काढला. सुनील हे जखमी झाल्याचे पहाताच आजूबाजूच्या प्रवाशांनी व इतर तिकीट तपासणीसांनी सुनील यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सुनील यांना रेल्वे रुग्णालयात हलविण्यात आले. आंबिवली रेल्वेस्थानकात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून या स्थानकात सीसी टीव्हीची संख्या वाढवा, पोलिसांची गस्त वाढवा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती सदस्य अमोल कदम यांनी यावेळी जखमी तिकीट तपासणीस यांची हॉस्पिलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली.