
स्मार्टसिटी प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे स्मार्टसिटी अंतर्गत ठाणे पूर्व कोपरी ते ठाणे स्थानक परिसरातील पश्चिमेकडील सॅटीस प्रकल्पातील पूल हा वाहतूक सुनियोजित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून ठाणे स्टेशन पूर्व परिसरात जी बसची वाहतूक होते. ती पूर्णत: स्वतंत्र करण्याचे नियोजन आहे. या पुलाचे काम नियोजित वेळेनुसार सुरू असून, पुलाच्या बांधणीसाठी एकूण ५८ खांब नियोजित असून या खांबांपैकी ४८ खांबांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नऊ खांबांचे काम सुरू असून त्यापैकी काही खांब हे शासकीय जागेत उभारावयाचे असून त्या जागेसंदर्भात संबंधित शासकीय आस्थापनांना पत्रव्यवहार करण्याचे आदेश देत सुरू असलेली प्रकल्प कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे स्मार्ट सिटी विभागाला दिल्या आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या नाल्याची कामे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेल्या ३९ प्रकल्पांपैकी सद्यस्थितीत सुरू असलेल्या १४ प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. ठाणे व मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वेस्थानकाच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला. शहरातील भुयारी गटार योजनांची कामे देखील वेळेत करण्याच्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात आतापर्यंत ४०० पैकी ३३० कॅमेरे पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित ७० कॅमेरा जोडणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना बांगर यांनी यावेळी दिल्या. तसेच हाजुरी येथील इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर येथील व्हीएमएस आणि व्हीए या प्रणालीतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याची कामे देखील तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.