बेघर मुलांचेही गोवर लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेघर मुलांचेही गोवर लसीकरण
बेघर मुलांचेही गोवर लसीकरण

बेघर मुलांचेही गोवर लसीकरण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : संपूर्ण शहरात गोवर रुग्णांमध्ये वाढ होत असताना गरीब स्थलांतरित वर्गातील नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बेघर मुलांचे लसीकरण करण्याची योजना पालिका आखत आहे. सर्व प्रभागांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका असलेल्या असुरक्षित मुलांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले असल्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

पदपथावर आणि पुलाखाली राहणारी बेघर कुटुंबे दररोज संघर्ष करत असतात. ते अनेकदा लसीकरणाच्या वेळापत्रकात अज्ञानामुळे मागे राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना संबंधित प्रभागांद्वारे सूचिबद्ध करणे आवश्यक आहे. प्रत्येक मूल महत्त्वाचे असल्याने लसीकरण हा हक्क आहे आणि आम्ही संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. गोवरचा अचानक उद्रेक झाल्यामुळे पूर्ण लसीकरण न केल्यामुळे लहान मुलांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मुंबईतील पाच वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांसाठी लसीकरण अनिवार्य केल्याचे सांगण्यात आले.

ज्या मुलांनी लसीकरणाचे डोस चुकवले आहेत किंवा घेतले नाहीत, त्यांच्या लसीकरणासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहोत. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांचीही यादी करून त्यांच्यासाठी या ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित केली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संध्याकाळी विशेष लसीकरण
संध्याकाळच्या वेळी ही शिबिरे घेतली जातील, कारण यातील बहुतेक मुले दिवसा सिग्नलवर भीक मागतात किंवा वस्तू विकतात. अनेक मुले त्यांच्या पालकांसोबत बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी जातात आणि संध्याकाळीच परत येतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनानंतर गोवरचा उद्रेक
मुंबईकर कोरोनाच्या उद्रेकातून बाहेर पडून काही महिनेच झाले आहेत; पण हा दिलासा अल्प काळासाठी होता. आतापर्यंत शहरात ६८ उद्रेक आणि ४९० रुग्ण नोंदले गेले आहेत. गंभीर संसर्गामुळे १६ मुलांना जीव गमवावा लागला आहे. गोवरचा प्रसार रोखण्यासाठी आणि मुलांचे संरक्षण करण्यासाठी पालिकेने विशेष लसीकरणावर भर दिला आहे.

विशेष लसीकरण सुरू
नोव्हेंबरमध्ये अनेक उद्रेक झाल्यानंतर पालिकेने अतिरिक्त लसीकरण सुरू केले आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार गुरुवारी (ता. १५) सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २८१ मुलांनी एमआर १ लस घेतली; तर १९८ मुलांनी एमएमआर डोससाठी सहभाग घेतला.

मुलांचे लसीकरण
एमआर १ लस १५,८५०
एमएमआर लस ९,५७६