
नशेसाठी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
अंधेरी, ता. १९ (बातमीदार) : नशेसाठी चोऱ्यांसह घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला एमएचबी पोलिसांनी राजस्थानातील मूळ गावातून अटक केली. पोलिस कारवाईदरम्यान सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार व त्यांच्या पथकावर नागरिकांनी घेराव घालून त्याच्या अटकेला विरोध केला होता, तरीही पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते.
बोरिवलीतील एका दुकानात ८ डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती. चोरट्याने ब्रॅण्डेड सिगारेटसह कॅश आणि इतर साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल पळवून नेला होता. याप्रकरणी एमएचबी पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. सीसी टीव्ही फुटेजवरून महेंद्रकुमार थानाराम मेघवाड हा आरोपी असल्याची खात्री पटली होती. तो राजस्थानच्या त्याच्या गावी पळून गेल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकाने राजस्थानमधील तखतगडच्या जोगानी गल्लीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी स्थानिक २५ ते ३० जणांच्या जमावाने पोलिसांना विरोध करून त्याला पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले. त्याच्याविरोधात दिडोंशी गुन्हे शाखा, गुजरातच्या सुरत, वलसाड आणि मिरा रोडच्या नयानगर पोलिस ठाण्यात पाचहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.