
कचऱ्याची ऑन दी स्पॅाट विल्हेवाट
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ ः कचरा निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका, घरगुती असे वर्गीकरण करून घरातच खत निर्मिती करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्याकरीता शहरातील मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच खत निर्मिती प्रकल्प राबवण्यासह नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागासाठी संवादातून भर दिला जात आहे.
नेरुळ सेक्टर ५४, ५६, ५८ येथील एनआरआय कॉलनी ही मोठी वसाहत आहे. याठिकाणी घनकचरा व्यवस्थापन नागरिकांशी संवाद साधत घरातच कचरा वर्गीकरण करण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. अशाच प्रकारे सेक्टर ४८ नेरुळ येथील साई संगम सोसायटीमध्येही सोसायटीच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शन केले गेले. तर कोपरखैरणे विभागामध्ये सेक्टर ११ येथील फार्म सोसायटीमध्ये त्याचप्रमाणे सेक्टर १० नेरूळ येथील एकता सोसायटीमध्ये नागरिकांशी संवाद साधत स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले. यावेळी प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबविण्याचा निर्धार करण्यात आला.
----------------------
खाडी किनाऱ्यांची स्वच्छता
ऐरोली विभागातील खाडी परिसरात ‘विथ देम फॉर देम’ या संस्थेच्या युवा सदस्यांच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या खाडी परिसर स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. खारफुटी भागातील कचरा एकत्रित करून तसेच खाडी किनारा स्वच्छ करण्यात आला. अशाच प्रकारे बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातही प्लास्टिक व सुका कचरा गोळा करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली.
----------------------------------------------
विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
सेक्टर ६ कोपरखैरणे येथील मैदानात रुपश्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मोहिमेत सहभाग घेतला. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे पसरणाऱ्या आजारांबाबत फकिरा मार्केट सेक्टर १५ नेरुळ तसेच वाशी, सेक्टर १४ व सेक्टर २९ येथील टेम्पो नाका व रिक्षा स्टँड त्याचप्रमाणे कोपरखैरणे धारण तलाव परिसरात प्रबोधन करण्यात आले.