रेल्वे पुलाची हादऱ्यातून मुक्तता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे पुलाची हादऱ्यातून मुक्तता?
रेल्वे पुलाची हादऱ्यातून मुक्तता?

रेल्वे पुलाची हादऱ्यातून मुक्तता?

sakal_logo
By

पनवेल, ता. १९ (बातमीदार) : पनवेल रेल्वे स्थानक आणि नवीन पनवेलला जोडणाऱ्या पादचारी पुलावरून हजारो प्रवाशांची रेलचेल असते. सद्यस्थितीत हा पूल धोकादायक झाला असून पुलाच्या खालून मालगाडी जाताच हादरे बसण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. याबाबतची बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध होताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. त्यासाठी रविवारी रात्रीपासून पुलाचा अर्धा भाग पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. परिणामी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना गर्दीचा त्रास सहन करावा लागला.
पनवेल रेल्वे स्थानकावर नवीन पनवेल शहराला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधण्यात आलेला आहे. रहदारीच्या वेळी रेल्वे पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पुलाचे २०१९ पासून कोणत्याही प्रकारचे ऑडिट झालेले नव्हते. रेल्वे पुलाखालून मालगाडी गेल्यास पुलाला हादरे बसत असतात. पुलाला आधार देण्यासाठी बसवण्यात आलेले लोखंडी खांबही गंजल्याने पुलाचा अपघात होऊन पादचाऱ्यांना याचा फटका बसू शकतो, हे लक्षात आल्याने नवीन पनवेलमधील अश्‍वथामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रेल्वे पूल दुरुस्ती करण्याची मागणी केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागणीनंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पूल धोकादायक असल्याचे आढळून आले. या संदर्भातील बातमी ७ डिसेंबर रोजी सकाळमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पुलाचे काम सोमवारी करण्यासाठी अर्धा जिना रविवारी रात्रीच बंद करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडाली. पर्यायी मार्ग नसल्याने गोंधळ उडाला होता. अनेकांनी बंद केलेल्या जिन्यावर चढून जाण्यास सुरुवात केली. अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेऊन गर्दी केलेल्या चाकरमान्यांना अडवले. शनिवार व रविवारी काम करण्याऐवजी सोमवारी करत असल्याबद्दल अनेक चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली.


रविवारी मेगाब्लॉक होता. शनिवारी कामावर जाणार्‍यांची संख्या कमी असते. त्या वेळी रेल्वे प्रशासनाने या पुलाचे काम करणे गरजेचे होते. सोमवारी पुलावर जाण्याचा अर्धा जिना बंद केल्याने कामावर जाण्याची घाई असताना त्रास सहन करावा लागत आहे.
- वैशाली पाटील, प्रवासी