अर्थपूर्ण नाताळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थपूर्ण नाताळ
अर्थपूर्ण नाताळ

अर्थपूर्ण नाताळ

sakal_logo
By

अर्थपूर्ण नाताळ
आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो
काळाच्या सुरुवातीपासून अनेक धर्म उदयास आले. आजसुद्धा निरनिराळे धर्म पाळणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. धर्मांचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये ‘धर्म देव-केंद्रित असावा की मनुष्य-केंद्रित असावा’ याविषयीची चर्चा आणि वादविवाद खूप रंगलेला मी अनुभवला आहे. धर्म हा माणसासाठी असला पाहिजे व धर्म हा देवाची पूजाअर्चा, स्तुती व प्रार्थना करण्यासाठी प्राधान्याने असावा, अशा प्रकारचे परस्परविरोधी आग्रह धर्म पाळणाऱ्यांकडून केले जातात, अशी चर्चा चालूच राहिली आहे. ‘प्रभू येशूने मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला,’ असे प्राचीन ख्रिस्ती परंपरा श्रद्धेने मानते.
नाताळ हा साक्षात हाडा-मांसाचा मनुष्य झालेल्या परमेश्वराच्या प्रेमाचा महासोहळा आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. माणसात परमेश्वर व परमेश्वरात माणूस अशी ख्रिस्ताची ओळख करून दिली जाते. मानवी स्वभाव आणि ईश्वरी स्वभाव यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता, दोन्ही स्वभाव स्पष्टपणे एकाच ख्रिस्तात जोडले गेले आहेत. सर्व इतिहासाला संपन्नतेकडे नेणारा, अशी प्रभू ख्रिस्ताची ओळख करून दिली जाते.
नाताळकाळी कोमल, मायाळू, दयाळू, कृपावंत आणि सौम्य वातावरण तयार होणे गरजेचे आहे. आजच्या जगाला त्याची खूप उणीव भासते. मानवतेची व्याख्या करताना मायाळू व दयाळू लक्षणे मोलाची ठरतात. माणुसकीचा अभाव हा आजच्या जगाला जडलेला रोग आहे. कारण सामान्य व्यक्तीला श्रेष्ठ मूल्याने गणले जात नाही. पैसा व वस्तू जास्त महत्त्वाच्या समजल्या जातात. गरीब समाजाला डोईजड वाटतात, घरात आजी-आजोबांची अडचण झाल्यासारखे त्यांच्याकडे बघितले जाते. मग अशा दृष्टिकोनातून पाहिल्यावर ‘वस्तू जशा घेता आणि वापरून फेकून देतात, तसे अशा घटकांना वागविले जाते. हा आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी नाताळ आहे.
माणसाने कसे जगावे हे शिकविण्यासाठी परमेश्वर मनुष्य झाला. प्रत्येक वर्षी नाताळ साजरा केला जातो. सर्वांना सोबत घेण्यासाठी विशेषकरून रंजल्या-गांजल्यांना आपले करण्यासाठी मोकळ्या मनाची, प्रामाणिक, सर्वांबरोबर संवाद साधण्यासाठी दक्ष व तत्पर असणारी, उदार, सढळ हाताची, खुल्या अंत:करणाची गरज निर्माण झाली आहे.
‘नाताळ गोठ्यातील येशूबाळाकडे कृपेची देणगी मागू या : परमेश्वराला जाणण्याची तीव्र उत्कंठा, परमेश्वराचा अनुभव घेऊन थक्क होण्याची जिद्द, परमेश्वराच्या सान्निध्यात जीवनाची नवलाई अनुभवण्याची भूक यासाठी कृपेची देणगी नाताळनिमित्त मागू या...
सर्वांना नाताळच्या शुभेच्छा!
- आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो
-----------
फोटो -