वाहतूक नियमांना तिलांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियमांना तिलांजली
वाहतूक नियमांना तिलांजली

वाहतूक नियमांना तिलांजली

sakal_logo
By

मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः मुंबईमध्‍ये वाहतूक नियमांचे सर्रास उल्‍लंघन होत असल्‍याचे दिसून येत आहे. विशेषकरून मुलुंडमध्‍ये वाहनचालक वाहतुकीच्‍या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्‍याने अपघातातही वाढ झाल्‍याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे. १ ते १९ डिसेंबरदरम्‍यान मुलुंड भागात तब्‍बल ६,१६८ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली असून विनासीटबेल्‍ट असलेल्या २,२०३ चालकांकडून तब्बल १,२३,३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांकडून रस्ते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात; परंतु वाहनचालक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्‍याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब गंभीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अपघात झालेल्या ठिकाणांचा अभ्यास करून पोलिसांतर्फे ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत; तरीही वाहनचालकांकडून पोलिसांच्या सूचनांची पायमल्ली होताना आढळून येत आहे. मुलुंडमध्येही वाहनचालकांकडून सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ‘रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. वाहनचालकाने वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बेदरकार वाहन चालवणे धोक्याचे असून त्यामध्ये वाहनचालक आणि सहप्रवासी गंभीररीत्या जखमी होऊ शकतात,’ असे मत नागरिक राहुल सकपाळ यांनी व्यक्त केले.

सीटबेल्‍ट लावण्याचा कंटाळा
मुंबई पोलिसांनी कारने प्रवास करताना सीटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. कारमधील सहप्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, वाहनचालकांकडून त्याबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे वाहतूक पालिसांच्‍या कारवाईदरम्‍यान दिसून आले आहे. पोलिसांकडून वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष होत असल्‍याने पालिसांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे.

वेगावर नियंत्रण गरजेचे
मुलुंड भागात वेगाने वाहन चालवण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्‍यास अपघातांनाही अंकुश बसेल, असे मत वाहतूक पोलिसांनी व्‍यक्‍त केले आहे.

१ ते १९ डिसेंबर मुलुंड पूर्व भागातील कारवाई
६,१६८ वाहनचालकांकडून नियमांचे उल्‍लंघन
२,२०३ वाहनचालक सीटबेल्‍टशिवाय
१,२३,३०० रुपये दंड वसूल
सहा किरकोळ अपघात

पोलिस वारंवार सीटबेल्टचे महत्त्‍व पटवून सांगत आहेत. मात्र, वाहनचालकांकडून त्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. त्‍यामुळे वाहतूक पोलिसांतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
- संपत लोंढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कांजूर वाहतूक विभाग

मुलुंड उपनगराला वाहतूक समस्येने घेरले असून ऐन कार्यालयीन वेळेत मुख्य रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. वेळेत कार्यालय गाठण्याच्या प्रयत्नात अनेक जण आपली गाडी वेगाने चालवतात. परिणामी अनेकदा गंभीर अपघात घडतात. ते टाळण्यासाठी मुलुंड पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. मात्र पोलिसांच्या सूचनेकडे वाहनचालक दुर्लक्ष करत असल्याचे सध्या चित्र आहे.
- रवी नाईक, सामाजिक कार्यकर्ते