वसई किल्ल्याबाहेरील पहिला चर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई किल्ल्याबाहेरील पहिला चर्च
वसई किल्ल्याबाहेरील पहिला चर्च

वसई किल्ल्याबाहेरील पहिला चर्च

sakal_logo
By

गाथा ख्रिस्त मंदिरांची
संदीप पंडित
सांडोर येथील संत थॉमस चर्च
पोर्तुगीज वसई किल्ल्यात आल्यानंतर त्यांनी वसई किल्ल्यात जवळपास सात चर्च उभारली होती; परंतु जसजसे ख्रिस्त धर्माचा प्रचार होऊ लागला तसतसे किल्ल्याच्या बाहेरही चर्चची आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी किल्ल्याबाहेर चर्च उभारण्यास सुरुवात केली. त्यातीलच किल्ल्याबाहेरील पहिलाच चर्च म्हणजे सांडोर येथील संत थॉमस चर्च होय.
वसईच्या किल्ल्याबाहेर उभारण्यात आलेला सांडोर येथील संत थॉमस चर्च हा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. या चर्चचा परिसर अत्यंत नयनरम्य आहे. या चर्चच्या मुख्य द्वारावर लावलेल्या पाटीत जेज्विट धर्मगुरूंनी हा चर्च बांधल्याचा उल्लेख आढळतो; मात्र ही पाटी १९३७ मध्ये व्हिकर रेव्ह. पी. जे. दिलीमा यांच्या कारकिर्दीत त्या वेळी उपलब्ध असलेल्या माहितीवरून लावण्यात आली आहे. प्रत्यक्षात ११ नोव्हेंबर १५६६ रोजी सांडोर येथे बांबूंनी आणि शेणमातीने उभारलेल्या ख्रिस्त मंदिरात पहिला मिस्सा बळी दिल्याचा उल्लेख दप्तरात आढळतो. त्यानंतर प्रत्येक रविवारी किल्ल्यातून मिस्सा विधी करण्यासाठी धर्मगुरू या चर्चमध्ये येत असत. त्या काळात थोर संत गोन्सालो गार्सिया हे सात वर्षांचे असताना किल्ल्यातील जेज्विट मठात शिकत होते. तेही त्या वेळी धर्मगुरूंबरोबर सांडोर चर्चमध्ये जात असावेत, असे जाणकारांचे मत आहे. १५६४ मध्ये वसईतील अनेक जाती-धर्मातील लोकांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. दीक्षा घेतलेल्या सर्वांना वसई किल्ल्यातील चर्चमध्ये येता येत नव्हते, म्हणून किल्ल्याबाहेर हे चर्च उभारण्यात आले. त्यानंतर या चर्चच्या विस्तारासाठी १५६७ मध्ये एका पोर्तुगीज विधवा बाईने त्यासाठी आपली जमीन दिली. आज या चर्चला किल्ल्याबाहेरील पहिले ख्रिस्त मंदिर म्हणून मोठा मान आहे.
============================================
आम्हा धर्मगुरूंना सहा वर्षांनंतर बदली मिळते. मी गेल्या वर्षी येथे आलो, या ठिकाणी असलेली लोक धार्मिक आहेत. चर्चच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. चर्चच्या माध्यमातून अनेक लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
- फादर थॉमस लोपीस, प्रमुख धर्मगुरू
==========================================