
‘पाणीपुरवठा विभागातील वॉलमनच्या तात्काळ बदल्या करा’
विरार, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अनेक वॉलमनच्या बदल्या न झाल्याने ते एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी त्यांचे लागेबंधे असल्याने अनधिकृत जोडण्या अथवा अधिक पाणी देण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे वॉलमनच्या तत्काळ बदल्या करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे. तत्कालीन आयुक्त गंगाधरन यांनी त्यांच्या कार्यकाळात २०२० मध्ये वॉलमनच्या बदल्या केल्या होत्या; पण यास दोन वर्षांहून अधिकचा कालावधी लोटला असतानादेखील या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप हितेश जाधव यांनी केला आहे. या आदेशात नमूद एकही वॉलमनची बदलीच्या ठिकाणी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रभागात कार्यरत वॉलमनची तात्काळ बदली करावी, तसेच गरजेनुसार त्यांची संख्या निश्चित करावी, अशी मागणी हितेश जाधव यांनी आयुक्तांकडे केली आहे; तर पुढील काळात तीन ठेकेदारामार्फत पाणीपुरवठा विभागाची कामे करून घेण्याचे ठरले असून आता प्रत्येक तीन ते सहा महिन्यांतून एकदा सर्व वॉलमनच्या बदल्या करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आले असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी स्पष्ट केले.