
शिक्षण मनोरंजक करण्यासाठी ‘अदाणी’चा उत्थान उपक्रम
मुंबई, ता. २१ ः महापालिका शाळांमधील मुलांची गळती थांबवण्यासाठीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटी व अदाणी फाऊंडेशनने ‘उत्थान’ उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत शिक्षण मनोरंजक करण्यासाठी मुलांना तसेच शिक्षकांनादेखील नवी कौशल्ये शिकवण्यात येत आहेत. यामुळे पालिका शाळांतील गळती थांबेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोविड काळात शिक्षणात अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढणे हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून अदाणी फाऊंडेशनने पालिकेच्या ३१ शाळांमधील मुलांना विविध अभ्यासक्रम शिकवण्यात आले. यात शिक्षकांनाही शिकवण्याच्या नवनवीन तंत्राचे प्रशिक्षण दिले जाते. हा कार्यक्रम लवकरच उपनगरातील ६० पालिका शाळांमध्ये विस्तारला जाईल, अशी माहिती दिली आहे.
जल्लोषचे आयोजन
‘उत्थान’ कार्यक्रमातून मुलांनी शिकलेल्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी ‘जल्लोष २०२२’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ३१ शाळांमधील मुलांनी वक्तृत्व, कथाकथन, एकांकिका, चित्रकला, गायन आणि टाकाऊ गोष्टींपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. विजेत्यांना पालिकेच्या आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उत्थानचा हेतू
देशाच्या तरुण लोकसंख्येमुळे होऊ शकणाऱ्या फायद्यांबाबत आपण बोलतोच; पण ते फायदे मिळविण्यासाठी, आपले मनुष्यबळ भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुरेसे कुशल असायला हवे. ‘उत्थान’सारख्या कार्यक्रमांद्वारे हा हेतू साध्य होईल, वंचित समाजघटकांतून आलेल्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक जगासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न याद्वारे होईल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.
महिलांचेही सबलीकरण
अदाणी फाऊंडेशनतर्फे ‘उत्थान’ व्यतिरिक्त झोपडपट्टीतील महिलांसाठी ‘स्वाभिमान’ कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमांतर्गत महिलांचे स्वयंसहायता गट तयार केले जातात, त्यांना पैसे कसे वाचवायचे आणि त्यांच्या बचतीतून उभे राहिलेले भांडवल लहान व्यवसायांसाठी कसे वापरायचे, हे शिकवले जाते. महिलांना साफसफाईची उपकरणे, मेणबत्त्या, मसाले, इमिटेशन ज्वेलरी आदी बाबी तयार करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणदेखील मिळते.