
फ्लॅटच्या प्रलोभनाने एसआरएच्या शिपायाची फसवणूक
अंधेरी, ता. २१ (बातमीदार) ः फ्लॅटच्या नावाने एसआरएच्या एका शिपायाची सुमारे ४० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील तिघांसह मध्यस्थ असलेल्या एजंटविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सिंधू दूरकर, मनीष दूरकर, अश्विनी दूरकर आणि प्रभाकर जिला अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमित महिडा हा वांद्रे येथील खेरवाडी परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. तो सध्या एसआरएमध्ये शिपाई म्हणून कामाला आहे. स्वस्तात घरासाठी हौसिंग डॉट कॉमची वेबसाईट पाहत असताना त्याची प्रवीण नावाच्या एका इस्टेट एजंटशी ओळख झाली होती. काही दिवसांनी त्याने त्याची भेट घेतली असता त्याच्यासह त्याच्या वडिलाने त्याला शास्त्रीनगरातील एसआरए इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर एक फ्लॅट असल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्यांच्या पत्नीसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. हा फ्लॅट मनीष आणि अश्विनी या दोघांच्या मालकीचा होता. या वेळी त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीची बोलणी होऊन मनीषने ४० लाखांमध्ये फ्लॅट विक्री करणार असल्याचे सांगितले. फ्लॅट आवडल्याने अमित महिडाने ४० लाखांमध्ये फ्लॅट खरेदीसाठी होकार दिला होता. याच फ्लॅटसाठी त्याने प्रभाकरच्या समक्ष सिंधू, मनीष, आश्विनी यांना टप्याटप्याने आठ लाख रुपये रोख; तर ३२ लाख धनादेश स्वरूपात असे ४० लाख रुपये दिले होते. या फ्लॅटची रजिस्ट्रेशन नोंदणी करून त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करून ते फ्लॅटचा ताबा देत नव्हते. याचदरम्यान त्यांना दूरकर कुटुंबियांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला असता फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवल्याचे समजले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.