जूचंद्रला ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जूचंद्रला ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा मान
जूचंद्रला ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा मान

जूचंद्रला ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा मान

sakal_logo
By

विरार, ता. २१ (बातमीदार) : जंजिरे वसई किल्ला ते केळवे जंजिरा किल्ला दरम्यान होणाऱ्या ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा मान यंदा जूचंद्र गावाला मिळाला आहे. या गावाला गौरवशाली इतिहास लाभला असल्याचे निकष ठेवून आयोजकांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे वसई तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जूचंद्र गावातील श्री हनुमंत मंदिरात किल्ले वसई मोहीम परिवाराचे प्रमुख व इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी युवा शक्ती प्रतिष्ठानचे पालघर अध्यक्ष प्रशांत सातवी, उत्तर कोकण लिपी मंडळप्रमुख दिव्या राऊत यांनी पालखी उत्सवाचे स्वरूप व उद्दिष्ट याबाबत संवाद साधला. जूचंद्र धार्मिक सेवा संस्था अध्यक्ष मनोज म्हात्रे, उपाध्यक्ष गणेश पाटील, कोषाध्यक्ष धनेश्वर भोईर, माजी अध्यक्ष पद्माकर पाटील, सल्लागार मदन माळी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. वसई मोहिमेतील योगदान, जूचंद्र गावातील पौराणिक परंपरा लाभलेले श्री चंडिका देवस्थान, श्री हनुमंत, वसई किल्ला उभारणीसाठी गावातील खडक, भौगोलिक बदल व ग्रामनामे बदल, श्री वज्रयोगिनी मूळ स्थाने, श्री वज्रेश्वरी देवी व तिच्या सहा बहिणींची उत्तर कोकणातील ठिकाणे आदींबाबत श्रीदत्त राऊत यांनी यावेळी माहिती दिली.
....
असा आहे पालखी उत्सव
१७३९ ते २०२३ हा पालखी उत्सवाचा कालखंड पाहता यंदा २८४ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा शनिवार, ७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता जंजिरे वसई किल्ला ते जूचंद्र गाव असा पालखीचा पहिला टप्पा असेल. त्यानंतर ८ जानेवारीला सकाळी ९ वाजता जूचंद्र गाव ते केळवा जंजिरा किल्ला असा ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा दुसरा टप्पा असणार आहे.
...
ग्रामस्थांमध्ये उत्साह
जूचंद्र गावातील पौराणिक श्री आदिशक्ती चंडिका देवस्थान व वसईचा गौरवशाली इतिहास लक्षात घेऊन यंदाच्या पालखी उत्सवाचा मान नायगाव जूचंद्र गावाला देण्यात आला आहे. तब्बल २८४ वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाचा मान आपल्या गावास प्रदान करण्यात आल्याने जूचंद्र गावातील स्थानिक ग्रामस्थांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
...

विरार : जूचंद्र गावात पार पडलेल्या बैठकीत पालखी उत्सवाचा मान जूचंद्र गावाला मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.