Raigad: रेवदंडा खाडी पुलासाठी १० कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raigad: रेवदंडा खाडी पुलासाठी १० कोटी
रेवदंडा खाडी पुलासाठी १० कोटी

Raigad: रेवदंडा खाडी पुलासाठी १० कोटी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. २१ : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आणि रोहा तालुक्यांना जोडणाऱ्या कुंडलिका खाडीवरील साळाव-रेवदंडा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. ३६ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल कमकुवत झाल्याने त्‍याची दुरुस्‍ती करावी, अशी मागणी अनेक वर्षांची होती.
रायगड जिल्ह्यातील अनेक पुलांची दुरवस्था झाली असून त्‍यांच्या देखभाल-दुरुस्‍तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव आणि साखर खाडी पूल या दोन महत्त्वाच्या पूलही जीर्ण झाले आहेत. एखादी दुर्घटना घडल्‍यास जीवितहानी होण्याची तसेच रोहा, मुरूड आणि अलिबाग या तीन तालुक्यांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
साळाव -रेवदंडा खाडी पुलाचे काम १९८६ मध्ये करण्यात आले असून पुलाची लांबी ५१० मीटर आहे. पुलाला बारा गाळे आहेत. या गाळ्याचे पिलर्स कमकुवत झाले असल्याचे स्ट्रक्टर ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. मध्यंतरी पुलाला मोठी भेग पडल्‍याने खालील पाणीही स्पष्ट दिसत होते. त्यावेळी बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी लावून त्या ठिकाणी काँक्रीटीकरण केले होते. तसेच पुलावरील खड्डेही बुजविण्यात आले होते.
सद्यस्‍थितीत पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे तुटले आहेत. तीन ते चार वेळा रोहे तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी जेटीवर जाणाऱ्या दगडी कोळशाच्या बार्जने पुलाला धडक दिली आहे. त्यानंतर पुलाला धोकादायक घोषित करीत अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती.

तीन तालुक्यांना जोडणारा कुंडलिका खाडीवरील साळाव-रेवदंडा पूल वर्दळीसाठी महत्त्वाचा असून परिसरातील गावांच्या विकासाचा सेतू आहे. मालवाहतूक बार्जच्या धडकेने तो कमकुवत झाला होता. त्यामुळे त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या डागडुजीनंतर अवजड वाहतूक पुन्हा सुरू होऊन विकासाला हातभार लागेल.
- आमदार महेंद्र दळवी, अलिबाग-मुरूड विधानसभा

पिलर्स, बेरिंग, स्लॅब सर्वच कमकुवत झाल्याने दुरुस्ती अत्यावश्यक आहे. हे काम सुरू झाले असून यासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तीन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने सुरुवातील अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरू ठेवून काम केले जात आहे. त्यानंतर पर्यायी वाहतुकीसंदर्भात निर्णय होईल.
- जगदीश सुखदेव, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग

टॅग्स :Raigad