
आंतरजातीय जोडपी सरकारी आहेरापासून वंचित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. ही योजना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येते. जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हा लाभ देण्यात येत असतो; मात्र मागील तीन ते चार वर्षे सरकारकडून या योजनेतील अनुदान प्राप्त न झाल्याने ४९६ जोडपी लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट २००४ मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. देण्यात येणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतवण्यात येत होती. उर्वरित रकमेचे संसारोपयोगी साहित्य दिले जात होते. वाढती महागाई आणि बदलत्या काळानुसार पंधरा हजार रुपयांची रक्कम अत्यंत कमी असल्याने यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंधरा हजार रुपयांवरून ही रक्कम पन्नास हजार करण्यात आली आहे. अस्पृश्यता निवारण योजनेचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे.
-------------------------------
वर्ष लाभार्थी
एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ १९०
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ १३७
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ २०५
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ १७५