
शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार
शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार
मुंबई, ता. २१ ः कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयातील गैरसोयींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून त्यासंदर्भात लवकरच संबंधितांची बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन वरील आश्वासन दिले.
उपनगरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शताब्दी रुग्णालयात अतिरिक्त शस्त्रक्रिया विभाग सुरू करावा, पदभरती करावी, औषधे उपलब्ध करून द्यावीत आदी मागण्या भातखळकर यांनी केल्या. सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे सामान्य रुग्णाला इथे न येता केईएम वा सायन रुग्णालयात जावे लागते, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शताब्दी रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील. मुंबईकरांचे आरोग्य उत्तम कसे राहील ते पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. यापूर्वीच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशी अवस्था झाली आहे. लवकरच त्यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊन हे प्रश्न सोडवू.