
श्री सिद्धिविनायक चरणी मनसेचे साकडे
प्रभादेवी, ता. २१ (बातमीदार) : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीचा गौरवापर करणाऱ्या मंदिर न्यासाच्या विश्वास्ताना सुबुद्धी देऊन भाविकांना न्याय मिळवून दे, असे साकडे मनसेने सिद्धिविनायक चरणी घातले आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात चाललेला अनागोंदी कारभार व कथित गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २१) आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात महिलांसह मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हातात फलक घेऊन विश्वस्तांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करत मंदिर परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन सिद्धिविनायकचे दर्शन घेतले.
अधिवेशनानंतर त्यावर चौकशी होईल, कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने आम्हाला दिले आहे. आता आम्ही विश्वस्तांना सुबुद्धी देण्यासाठी सिद्धिविनायकाला गाऱ्हाणे घालण्यासाठी आलो आहोत.
– यशवंत किल्लेदार, मनसे उपाध्यक्ष