३२ हजार फूट उंचीवर यशस्वी उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३२ हजार फूट उंचीवर यशस्वी उपचार
३२ हजार फूट उंचीवर यशस्वी उपचार

३२ हजार फूट उंचीवर यशस्वी उपचार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : जमिनीपासून ३२ हजार फूट उंच, तीन दिवसांचा उपवास, शिवाय कँटिनचे जेवण आवडत नसल्याने उपाशीपोटी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अत्यवस्थ वाटू लागले. अशातच विमानात उद्‍घोषणा होते, ‘फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर आहे का? आमच्याकडे बोर्डवर वैद्यकीय आणीबाणी आहे’. घोषणा ऐकल्यानंतर त्याच विमानात असलेल्या डॉक्टरने तात्काळ अत्यवस्थ रुग्णाकडे धाव घेऊन त्याच्यावर यशस्वी उपचार केले. डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दिल्ली ते मुंबई विमान शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास समुद्र सपाटीपासून ३२ हजार फूट उंचीवर होते. या विमानातून मूळचा कोल्हापूरचा असलेला सुशांत शेळके (३०) हा अभियंता तरुणही प्रवास करत होता. तीन दिवस उपवास शिवाय पोटात अन्न नसल्याने त्याला विमानात अत्यवस्थ वाटू लागले. ही बाब एअर हॉस्टेसच्या लक्षात येताच त्यांनी विमानात डॉक्टरांबद्दल तीन वेळा उद्‍घोषणा केली. त्याचवेळी मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निरंजन चव्हाणदेखील प्रवास करत असल्याने त्यांनी प्रसंगवधान दाखवून सुशांतकडे धाव घेतली.

‘सुशांतला श्वास घ्यायला जमत नव्हते आणि त्याचे डोळेदेखील मिटले होते. त्याची नाडी तपासली, ती ९६ बीट्स/मिनिटे म्हणजे खूप कमकुवत दाखवत होती. त्याचा रक्तदाब कमी होत होता. रक्तदाब वेगाने कमी होऊन हात थंडगार व घामेजलेले झाले होते. सुशांतने दिवसभर फक्त चहा आणि बिस्किटे खाल्ली होती. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला ऑक्सिजन सुरू केला, मी त्याच्या जिभेवर साखर ठेवली. फळांचा रस दिला, शिवाय त्याच्या शरीरात उबदारपणा वाढवण्यासाठी हातांची मालिश केली. अशाप्रकारे ४५ मिनिटांच्या उपचारानंतर त्याला बरे वाटू लागल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

हवेत उपचाराचा अनोखा अनुभव
विमान जमिनीवर उतरेपर्यंत मी त्याच्या बाजूला बसलो होतो. या वेळी एअर होस्टेस कविता, शिप्रा आणि हमरझायडे यांनीही सहकार्य केले. रात्री ११.१० वाजता मुंबई विमानतळावर आमचे इमर्जन्सी लँडिंग झाले. विमानतळावरील डॉक्टरांनी सुशांतला निरीक्षणाखाली घेतले. यानंतर विमानाच्या कॅप्टनने माझी भेट घेत आभार मानले. मला माझे नाव, वैद्यकीय पदवी आणि एमएमसी नोंदणी क्रमांकाबद्दल तपशीलांसह एक फॉर्म भरण्यास सांगितले गेले. मी विमानातून उतरणारा शेवटचा प्रवासी होतो. माझा दिवस असा संपेल असे मला कधीच वाटले नव्हते. जमिनीपासून उंच हवेत रुग्णावर उपचार करण्याचा हा अनोखा अनुभव होता असे डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितले.