
काँक्रिट रस्त्यांचे जॉईंट भरण्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ठाणे महापालिकेने शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या मधील जॉईंट भरण्याचे काम हाती घेतले आहे. सिमेंट रस्त्यावरील जोडणीचा (जॉईंट) अंदाज न आल्यास दुचाकीस्वारांचा अपघात होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. हे अपघात रोखण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत ३७० किलोमीटरचे रस्ते आहेत. यातील अर्धे सिमेंट तर अर्धे डांबराचे आहेत. त्यातील आता ४५ किलोमीटर सिमेंट रस्त्यांकडे पालिकेने आपला मोर्चा वळविला आहे. सिमेंट रस्त्याच्या मधील जॉईंट किंवा बाजूला असलेल्या चढ-उताराच्या रस्त्यामुळे खासकरून दुचाकीस्वारांना त्याचा अधिक त्रास होतो. त्यावरून अनेकदा अपघात घडतात. मागील काही महिन्यांपूर्वी अशा रस्त्यांची पाहणी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची निविदा काढण्यात आली. त्यानुसार आता १.०५ कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्त्यावरील जॉईंट भरून काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, कळवा, खारेगाव, मुंब्रा रेतीबंदर आदींसह शहरातील इतर भागात असलेल्या ४५ किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यांवर हे काम सुरू असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली.