
ठामपाच्या तीन अभियंत्यांना उपनगर पदी बढती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : गेल्या काही वर्षांपासून ठाणे पालिकेच्या रिक्त उपनगर अभियंता पदावर तीन कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी विनोद पवार यांच्यासह विकास ढोले आणि रामदास शिंदे यांचा यामध्ये समावेश असून, त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. रामदास शिंदे यांच्याकडे रस्ते आणि नाले बांधणी विभाग, विकास ढोले यांच्याकडे शहर सौंदर्यीकरण, पाणी पुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण विभाग; तर विनोद पवार यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तिन्ही अधिकारी गेल्या काही वर्षांपासून या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. महापालिकेतून उपनगर अभियंता पदाचे अधिकारी काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रामदास शिंदे, विकास ढोले, विनोद पवार आणि भरत भिवापूरकर यांची नियुक्ती केली होती. जयस्वाल यांच्या बदलीनंतर आलेले तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तांत्रिक कारणास्तव त्यांची नियुक्ती रद्द करून बढती रोखली होती. त्यातील भिवापूरकर हे सेवानिवृत्त झाले. अखेर आयुक्त अभिजीत बांगर यांनी तिन्ही अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी दिल्याने त्यांची उपनगर अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.