
पंतनगर पोलीस ठाण्यातील तिघांना उत्कृष्ट गुन्हे शोध रिवार्ड
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः पंतनगर पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकासह दोन अंमलदारांना उत्कृष्ट गुन्हे शोध रिवाॅर्ड देण्यात आले आहे. यामध्ये उपनिरीक्षक स्वप्नील साळुंखे, अंमलदार संतोष गिध तसेच महिला पोलिस कस्तुरी मस्के यांचा समावेश आहे. या तिघांनी सायबर संदर्भातील तब्बल ३५ गुन्ह्यांची उकल करत त्यातील अनेक आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयातून त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे आदेश देण्यात आले होते. २३ जुलै रोजी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पंतनगर पोलिस ठाण्याला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी या तिघांच्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले होते. त्यांनी ३५ सायबर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. तसेच सायबर सेफ या सॉफ्टवेअरचा वापर करून हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यातून फिर्यादींना त्यांचे लाखो रुपये मिळवून दिले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले होते.