
आनंदराव आडसूळ यांची अधिकाऱ्याला मारहाण!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २०) अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेहबूबखान पठाण यांच्यावर मंत्रालयाच्या परिसरात आकाशवाणी आमदार निवास येथे मंगळवारी रात्री अडसूळ आणि त्यांच्या तीन साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दि महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पठाण यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले; परंतु आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी या सोसायटीत आमची युनियन असून, सभासदांची वर्गणी पतपेढीमार्फत भरा, तसेच दोघा कर्मचाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती करा, अशी मागणी करत मंगळवारी पतसंस्थेत येऊन वाद घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. युनियनची वर्गणी पतसंस्थेने भरणे नियमाबाह्य आहे, ते करता येणार नाही. तसेच दोघा कर्मचाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्याबाबत आगामी बैठकीत निर्णय घेऊ, असे पठाण यांनी अडसूळ यांना सांगितले; परंतु असे सांगूनही त्यांनी मारहाण केल्याचे पठाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना कारवाईचे निवेदन
महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांना मारहाणीचा प्रयत्न; तर वरिष्ठ लिपिक संगीता मोरे यांनाही धमकावण्यात आल्याचे समजते. बुधवारी (ता. २१) सकाळी हा प्रकार समजल्यानंतर मंत्रालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गात खळबळ माजली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणी कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा नेण्याचा निर्णयही संतप्त कर्मचारी वर्गाने घेतला आहे.