
वेतन अडवल्याने कामगारांचा असहकार
भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : ठेकेदाराकडून रोजंदारीचे पैसे न मिळाल्याने कामगारांनी कचरा घेऊन जाणाऱ्या गाड्या बुधवारी (ता. २१) अडवून ठेवल्या. आमचा पगार द्या, तरच आम्ही काम करू, अशी भूमिका कामगारांनी घेतली. यावर महापालिकेने ठेकेदारास कामाचे पैसे दिले आहेत. लवकरच कामगारांचे वेतन देण्याबाबत सूचना केल्या असल्याची माहिती आरोग्य व स्वच्छता विभाग प्रमुख जे. एम. सोनवणे यांनी दिली.
भिवंडी महापालिकेने शहरातील कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर वाहून नेण्यासाठी आर. एन. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. यासाठी पालिकेकडून प्रतिटन १२२९ रुपये दिले जातात, पण या ठेकेदाराकडून आमचे वेतन दिले जात नाही, असा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी बुधवारी सकाळी कचऱ्याच्या गाड्या चाविंद्रा येथील वजन काट्यावर थांबवून ठेवल्या. यामुळे परिसरात कचऱ्याची दुर्गंधी पसरली. वेतन दिले जाईल तेव्हाच काम करू असा इशारा कामगारांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासनातील काही अधिकारी ठेकेदारास पाठीशी घालत असल्याने कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे.