
व्याजदरवाढ आधीच थांबवल्यास मोठी घोडचूक ठरेल
मुंबई, ता. २१ : देशातील चलनवाढीला आळा घालण्यासाठी व्याजदरवाढीचे सुरू केलेले सत्र वेळेपूर्वीच थांबवले, तर ती अत्यंत मोठी घोडचूक ठरेल व ती खूप महाग पडू शकते, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण आढावा बैठकीत व्यक्त केली होती.
५ ते ७ डिसेंबरदरम्यान झालेल्या या बैठकीनंतर रेपो दर ०.३५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत रेपो दर वाढवू नये असा एक मतप्रवाह होता, पण गव्हर्नर दास यांनी ठाम भूमिका घेतल्यानेच बहुसंख्य सदस्यांनी दरवाढीला पाठिंबा दिला. केवळ एका सदस्याने त्यास विरोध केला. या बैठकीचे इतिवृत्त रिझर्व्ह बँकेने आज प्रसिद्ध केले, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत शशांक भिडे, अशिमा गोयल, राजीव रंजन, मिखाईल पात्रा आणि दास यांनी रेपो रेट वाढवण्यास मंजुरी दिली; तर जयंत वर्मा यांनी या निर्णयास विरोध केला.
व्याजदरवाढीचे सत्र आधीच बंद केल्यास पुढील बैठकांमध्ये परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणखी धावाधाव करावी लागेल आणि आणखी कठोर निर्णय घ्यायला लागतील, अशीही भीती दास यांनी व्यक्त केली. यापूर्वीच्या बैठकांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर अर्धा टक्का वाढवला होता, त्यात कपात करून आता तो केवळ ०.३५ टक्के एवढाच वाढवण्यात आल्यामुळे चलनवाढीची बिकट स्थिती आता सुधारत असल्याचे ते संकेत असल्याचे मानले जात आहे. या बैठकीनंतर पॉलिसी रेपो रेट ६.२५ टक्के झाला आहे.
चलनवाढीचा अंदाज बांधता येत नाही
---------------------------
भूराजकीय परिस्थिती, युरोपातील युद्धजन्य स्थिती, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता तसेच निसर्गाचा लहरी कारभार या कारणांमुळे भविष्यातील चलनवाढीबद्दल आताच निश्चित अंदाज बांधता येत नाही असेही दास म्हणाले. अजूनही चलनवाढीचा दर सहाच्या आसपास असल्यामुळे अद्याप चलनवाढीविरोधातील लढाई संपली नाही. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही दास म्हणाले. अशा स्थितीत अर्जुनाने जसे पक्ष्याच्या डोळ्यावर लक्ष्य ठेवले होते तसेच चलनवाढीच्या परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवून जरूर तर कारवाई करणे गरजेचे असल्याचेही दास यांनी बैठकीत म्हटले.