
विमानतळांवरील वाढत्या गर्दीचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : हिवाळी सुट्या, नाताळ आणि नवीन वर्षासाठी पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे मुंबई आणि बेगळूरु विमानळांवरील गर्दीचा आढावा नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी बुधवारी (ता. २१) घेतला. या आढावा बैठकीत मुंबई नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे (डीजीसीए) महासंचालक आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाचे (बीसीएएस) अधिकारी आणि विमानतळाचे ऑपरेटर्स उपस्थित होते.
काही प्रमुख विमानतळ गर्दीचा सामना करत आहेत. तसेच सहलीच्या हंगामात प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे विमानतळांवर प्रवाशांना अधिक वेळ प्रतीक्षा करायला लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ७ डिसेंबरला यासंदर्भातली एक बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन समस्यांच्या मुळाशी जाऊन क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले होते. यावर सचिवांनी आजच्या बैठकीत भर दिला.
रिअल टाइम बेसिस प्रतीक्षा वेळ सूचित करण्यासाठी विमानतळाच्या एंट्री गेट्सवर, सिक्युरिटी लेनवर साइन बोर्ड लावणे आणि सोशल मीडिया फीड्स माध्यमातून ही माहिती शेअर करणे, सर्व एअरलाइन्स त्यांचे चेक-ईन योग्य प्रकारे करत आहेत का, पुरेसे काउंटर आहेत का हे पाहणे, अतिरिक्त क्ष-किरण मशीन ठेवणे, सुरक्षा मार्गांची संख्या वाढवणे, गर्दीच्या वेळांचे संतुलन राखणे, सुरक्षा मार्गांच्या उपलब्धतेसह उड्डाण वेळापत्रक, प्रवाशांना सर्व संबंधित माहिती देणे यासंदर्भात अहवाल दररोज सादर करण्याचे निर्देश सुद्धा विमानतळ प्रशासनाला देण्यात आले आहेत.