
संजय पांडे यांची जामिनावर सुटका
मुंबई, ता. २१ : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग आणि को-लोकेशन प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर केला. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सप्टेंबरमध्ये संजय पांडे यांना अटक केली होती.
एनएसई फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच पांडे यांना जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने संबंधित ईडी प्रकरणात संजय पांडे यांना आधीच जामीन मंजूर केला असल्यामुळे कोर्टाला जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याच प्रकरणात ईडीने रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांनाही अटक केली होती. या प्रकरणात ईडीने अटक केलेला रवी नारायण हा तिसरा व्यक्ती होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने कथित नॅशनल स्टॉक एक्स्चेंज को-लोकेशन घोटाळ्यात गुन्हा नोंदवला होता. याच प्रकरणात संजय पांडे यांना अटक करण्यात आली होती.