अपघातांची संख्‍या वाढता वाढता वाढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातांची संख्‍या वाढता वाढता वाढे
अपघातांची संख्‍या वाढता वाढता वाढे

अपघातांची संख्‍या वाढता वाढता वाढे

sakal_logo
By

ठाणे, ता. २२ (वार्ताहर) : शहरात वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची पथके तैनात असतात. त्‍यांना गुंगारा देऊन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने यंदाच्या वर्षी रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्‍ये मृत्युमुखी पडणाऱ्या वाहनचालकांची संख्याही वाढीस लागलेली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस करताना दिसतात.

ठाणे वाहतूक विभागाच्या अखत्यारित तब्बल १८ उपविभाग आहेत. यात ठाणेनगर, कोपरी, नौपाडा, वागळे, राबोडी, कापूरबावडी, कासारवडवली, कळवा, मुंब्रा, नारपोलिस, भिवंडी, कोंगाव, डोंबिवली, कोळसेवाडी, कल्याण, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ यांचा समावेश आहे. रस्‍ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिस हे सातत्याने जनजागृती करतात. पथनाट्य, रस्ते सुरक्षा सप्ताह, पोस्टर्स यांचा यामध्‍ये समावेश आहे. मात्र, मागील वर्षापेक्षा यंदा अपघातात मृत्यूचा आकडाही वाढलेला आहे.
--------------------------------------------
विविध उपक्रम हाती
ठाणे वाहतूक विभागाच्या माध्यमातून वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणि रस्‍ते अपघातांना टाळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. वाहतुकीचे नियमन करणे, ठिकठिकाणी वाहतूक पोलिस आणि वॉर्डन तैनात करणे, रस्त्यावर वाहतूक कोंडीसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ न देणे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वेळोवेळी समज देणे, वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करणे, रस्त्यातील अडथळे दूर करणे अशा उपाययोजना करण्‍यात येतात.
----------------------------------------------
रस्‍ते अपघाताची कारणे...
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, सिग्नल तोडणे.
दुचाकीवर तीन लोकांनी प्रवास करणे.
मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे.
मार्गिकेच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे.
रहदारीच्‍या नियमांचे उल्लघन करणे.
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे.
वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे.
------------------------------------------
अपघात रोखण्यासाठी सज्जता
वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी विविध ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात असतात. प्रत्येक वर्षी वाहतुकीचे नियम मोडणारे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस सज्ज आहेत. नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
--------------------------------------------
विविध कारणास्तव रस्ते अपघातात बळींची संख्या वाढत आहे. वाहनचालकांनो, तुमची घरी कुणी तरी वाट पाहत आहे. सदृढ जीवन सुंदर जीवन आहे. तुम्ही वाहन सावकाश चालवा, वाहतुकीच्या नियमाचे पालन करा, अन सुरक्षित रहा, अति घाई संकटात नेई याचा विसर पडू देऊ नका.
- डॉ. विनय राठोड (उपआयुक्त, ठाणे वाहतूक विभाग)
==========================================
प्रकार २०२१ मृत्यू नोव्हेंबर २०२२ मृत्यू
===================================================
अपघात १६७ १७८ १८५ १९७

गंभीर जखमी ३२१ ३७५ ३४९ ४१४

किरकोळ जखमी १६९ २५७ १८४ २६५

अपघात विना जखमी ५० ०० ५६ ००
==================================================
एकूण ७०७ ८१० ७७४ ८७६