
जोगेश्वरीत डासांच्या उपद्रवामुळे म्हाडावासी व विद्यालयातील विद्यार्थीही हैराण
जोगेश्वरी, ता. २२ (बातमीदार) ः सर्वोदयनगर येथील श्री समर्थ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील बाकांसह काही साहित्य ठेवले आहे. या साहित्यांची स्वच्छता न केल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे येथील रहिवाशांसह विद्यार्थीवर्गालाही त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने तसेच शाळा व्यवस्थापनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीच्या आयकर वसाहतीलगत स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या पूर्ण इमारतीच्या दुरुस्तीचे काम गेले काही महिने सुरू आहे. त्यामुळे येथील बाक व इतर साहित्य तात्पुरत्या स्वरूपात काही महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या सर्वोदयनगर येथील श्री समर्थ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात ठेवले आहे. तसेच विद्यार्थीही याच शाळेत शिकत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शाळेच्या आवारात ठेवलेली बाक व इतर साहित्य भिजू नये म्हणून पूर्ण साहित्यावर ताडपत्री ठेवून झाकण्यात आले आहे. दुर्लक्षामुळे पावसाळ्यानंतर ताडपत्री न काढल्याने आजूबाजूच्या झाडाच्या पालापाचोळा पडून येथे साचून राहिल्याने झाकलेल्या बसण्याच्या बाकाखाली घाणीचे सामाज्य निर्माण झाले आहे. तसेच वेळोवेळी साफसफाई न केल्यामुळे व घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
साहित्याचा बंदोबस्त करणार
स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी बाढकर यांनी येथे ठेवलेल्या साहित्याच्या घाणीमुळे व अस्वच्छतेमुळे आवारात डासांचे प्रमाण वाढल्याचे मान्य केले आहे. तसेच लवकरात लवकर येथे पालिकेकडून कीटकनाशक औषधाची फवारणी करून साहित्याचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले. श्री समर्थ विद्यालयाचे सचिव सुनील नलावडे यांनीदेखील लवकरात लवकर पावसाळ्याच्या दिवसात साहित्यावर टाकलेले प्लास्टिक काढून येथील परिसर स्वच्छ करणार असल्याचे सांगितले.
केवळ धूरफवारणी उपयोगाची नाही
नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. केवळ धूरफवारणी केली तरी काहीही उपयोग नाही. शाळेच्या आवारात ठेवलेल्या साहित्याखाली झालेल्या घाणीमुळेच मच्छर वाढले आहेत. जोपर्यंत येथील साहित्या हटवून येथे स्वच्छता मोहीम राबवत नाही, तोपर्यंत धूरफवारणी करून काहीच उपयोग नसल्याचे पालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.