बेवारस वाहनांचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेवारस वाहनांचा ठिय्या
बेवारस वाहनांचा ठिय्या

बेवारस वाहनांचा ठिय्या

sakal_logo
By

नेरूळ, ता. २२ (बातमीदार)ः झपाट्याने शहरीकरण होणाऱ्या नवी मुंबई शहरात वाहने पार्किंगच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता शहरातील बेवारस वाहनांचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. पार्किंगच्या नावाखाली ही वाहने वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी धूळ खात पडलेली असून नेरूळ रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेले सिडकोचे वाहनतळदेखील यातून सुटलेले नाही.
नवी मुंबईतील शहराला वाहन पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. अनेक विभागांमध्ये पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. नेरूळ पूर्व व पश्चिम अशा दोन्ही विभागांत पार्किंगसाठी जागाच नसल्याने पालिकेचे दुर्लक्षित असलेले भूखंड, उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागा काबीज केल्या जात आहेत. तसेच शहरातील अरुंद रस्त्यांच्या दुतर्फाही वाहने उभी केली जात आहेत. अशातच आता रेल्वेस्थानकातील वाहनतळामध्ये वर्षानुवर्ष पडलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्न देखील अधिक झाला आहे. नवी मुंबईतील पालिकेच्या जागांसोबतच सिडकोचे वाहनतळ देखील बेवारस वाहनांनी व्यापले आहे. या वाहनांचा गुन्हेगारी कारवायांसाठी दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी ही बेवारस वाहने तातडीने निकालात काढावी, अशी मागणी होत आहे.
------------------------------------------
पोलिसांसाठी डोकेदुखी
बँकांकडून अनेक वेळा कर्ज घेऊन रिक्षा व अन्य वाहने घेतली जातात. मात्र कर्जाचे हप्ते थकल्यावर संबंधित संस्थांकडून अशी वाहने जप्त केली जातात; परंतु अशा वाहनांसाठी संस्थांकडे जागा नसल्याने ती सार्वजनिक जागेत उभी केली जातात. त्यामुळे बँकांकडून शासकीय जागांचा फुकटात वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे. या वाहनतळाचा वापर कंत्राटदार मर्जीनुसार करत असल्याचे दिसून येत असून सिडकोचे होणारे दुर्लक्ष पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे.
------------------------------------------
नेरूळ रेल्वेस्थानकातील काही वाहने वर्षानुवर्ष ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. याबाबत नवी मुंबई वाहतूक पोलिस, पालिका व सिडको काहीच कारवाई करत नाही. अशा वाहनांची सिडकोने चौकशी करणे गरजेचे आहे. ही वाहने हटवून जागा मोकळी करणे गरजेचे आहे, अन्यथा या वाहनांचा गुन्हेगारीसाठी गैरवापर होण्याची शक्यता आहे.
- विजय घाटे, अध्यक्ष, नेरूळ स्टेशन कॉम्प्लेक्स असोसिएशन
--------------------------------
शहरातील बेवारस वाहनांबाबत पालिकेशी संपर्क साधून ती हटवण्यासाठी कारवाई करत असतो. सिडकोच्या रेल्वेस्थानकामध्ये अशी बेवारस वाहने असल्यास प्रशासनाला लेखी कळवतो. पुन्हा अशी वाहने आढळल्यास चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
-तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग