
पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास
वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत परिसरात असलेल्या दाभाड पाड्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाड्यात कूपनलिका, नळजोडणी देऊनसुद्धा मागील काही महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्याने हातातील काम सोडून महिलांना पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास करावा लागतो.
दाभाड पाड्यामध्ये जवळपास ३०० हून अधिक नागरिक राहत असून त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या आदिवासी पाड्यावर पाण्यासाठी सरकारकडून विविध योजना अंतर्गत कूपनलिका व नळ जोडणी बसवण्यात आली; परंतु त्या कूपनलिकेसह नळांमध्ये पाणीच येत नाही. वारंवार तक्रार करूनसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध होऊ नये, ठेकेदार नेमण्यावरून अनेक कामे या पाड्यातील रखडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. ग्रामपंचायतीकडून अनेक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येची दखल घेतली जात नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शौचालय बांधण्याची मागणी
महिलांना व विद्यार्थिनींना शौचालयासाठीसुद्धा व्यवस्था नसल्याने रात्रीच्या अंधारात जंगलामध्ये जावे लागते. या ठिकाणी सापांची भीती असल्याने पाड्यात शौचालय लवकरात लवकर बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावात नळजोडणी, कूपनलिका आहेत. मात्र त्याला गेल्या तीन महिन्यांपासून पाणीच येत नाही. आता ते सुद्धा काढून नेले आहेत. पाण्याच्या समस्येबाबत खोणी ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अजूनही ठोस उपाययोजना प्रशासनाने केली नाही.
- गणूबाई मारुती मोरे,
नागरिक, दाभाडी पाडा