
अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई
अलिबाग, ता. २२ ( बातमीदार )ः शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एसटी स्थानकाच्या जवळ अनधिकृतपणे फेरीवाल्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने नगर परिषद, पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी गुरुवारी रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई केली. बस स्थानकासमोरील गजरे, फूल, फळ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांची तारांबळ उडाली.
रस्त्यालगत फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्याने प्रवाशांसह वाहनचालक व पादचाऱ्यांची गैरसोय होते, अनेकदा वादही निर्माण होतो. शिवाय अपघात व वाहतूक कोंडीचा प्रश्नही नित्याचाच झाला आहे.
रस्त्यांच्या साईडपट्टीवर थाटलेल्या विक्रेत्यांचे स्टॉल जप्त करण्यात आले.
बस स्थानकाजवळ असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. अलिबाग पोलिस व वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटू नये.
नगर परिषदेने व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी भाजी, फळ-फुले विक्री करावी.
- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद